मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dec 28, 2024 07:08 AM IST

Manmohan Singh Funeral: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळी ११.४५ मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार (PTI)

Manmohan Singh Funeral At Nigambodh Ghat: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.४५ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.

मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांच्यावर २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी नवी दिल्लीतील निगमबोध घाटात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून काँग्रेसच्या अकबर रोड येथील मुख्यालयात नेण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता अंत्ययात्रा निगमबोध घाटाकडे निघणार आहे. तेथे सकाळी ११.४५ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री दिली. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

दिल्ली वाहतूक पोलिसांकडून अ‍ॅडव्हायजरी जारी

दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

  • रिंगरोड (महात्मा गांधी मार्ग), निषाद राज मार्ग, बुलेवार्ड रोड, एसपीएम मार्ग, लोथियन रोड आणि नेताजी सुभाष मार्गावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध, नियम आणि वळण लागू केले जाऊ शकते.
  • दिल्ली पोलिसांनी जुने दिल्ली रेल्वे स्थानक, आयएसबीटी, लाल किल्ला, चांदनी चौक आणि तीस हजारी कोर्टात जाणाऱ्यांना या मार्गावरील संभाव्य विलंबाला सामावून घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊन निघून जाण्याचा सल्ला

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माजी पंतप्रधानांचे स्मारक ज्या ठिकाणी उभारता येईल, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी विनंती केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेसाठी आणि स्मारकासाठी जागा न मिळणे हा भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणीवपूर्वक अपमान आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

देशाचे माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ज्ञ आणि शीख समुदायातून आलेले देशाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अंत्ययात्रेसाठी राजघाटावर स्थान न देणे हे मोदी सरकारच्या छोट्या आणि क्षुद्र विचारसरणीचे द्योतक आहे, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर