Manmohan Singh Demise : मनमोहन सिंग हे त्यांच्या आर्थिक सुधारणांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांच्या स्पॉट रिस्पॉन्सचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. अशीच एक घटना २७ ऑगस्ट २०१२ रोजी घडली होती. मनमोहन सिंग सरकारवर कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनमोहन सिंग म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. मनमोहन सिंग हे मौनी बाबा असल्याची टीका विरोधक त्यांच्यावर करत होते. विरोधकांच्या या टीकेबद्दल त्यांना पत्रकारांनी संसद भवनाबाहेर विचारले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधिंना एक शेर ऐकवलासिंग म्हणाले,‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’. हा शेर सुनावत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले होते.
आपल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर नेणारे माजी अर्थमंत्री आणि दोन वेळा पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये सिंग यांनी अर्थमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ८.५ टक्क्यांच्या आसपास होती. देयक संतुलनाची तूट देखील मोठी होती आणि चालू खात्यातील तूटही जीडीपीच्या ३.५ टक्क्यांच्या जवळपास होती. शिवाय जीवनावश्यक गोष्टींच्या आयातीसाठी पैसे देण्यासाठी देशाकडे केवळ दोन आठवड्यांचे परकीय चलन होते. यावरून अर्थव्यवस्था त्यावेळी गंभीर संकटात असल्याचे स्पष्ट झाले होते.
अशा परिस्थितीत डॉ. सिंग यांनी १९९१-९२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशात नव्या आर्थिक युगाची सुरुवात केली. धाडसी आर्थिक सुधारणा, लायसन्स राज संपुष्टात आणणे आणि अनेक क्षेत्रे खासगी आणि परदेशी कंपन्यांसाठी खुली करणे यासह स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील हा एक टर्निंग पॉईंट होता. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या. भारताला नव्या आर्थिक धोरणाच्या मार्गावर नेण्याचे श्रेय डॉ. सिंग यांना जाते. थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय), रुपयाचे अवमूल्यन, करात कपात आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करून त्यांनी नवी सुरुवात केली.
मे २००४ मध्ये मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. पुढची १० वर्षे त्यांनी देशाची आर्थिक धोरणे आणि सुधारणांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यांच्या अध्यक्षतेखालीच २००७ मध्ये भारताचा विकासदर ९ टक्के होता आणि तो जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला होता. त्यांनी २००५ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) आणला आणि विक्रीकराची जागा मूल्यवर्धित कराने (व्हॅट) घेतली.
संबंधित बातम्या