Manmohan Singh Funeral: आर्थिक सुधारणांचे जनक भारताचे माजीपंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग आज (शनिवार) पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्यातीनमुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपतीजगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी,भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
तत्पूर्वी काँग्रेस मुख्यालयापासून निगमबोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ‘जब तक सूरज चांद रहेगा, मनमोहन आपका नाम रहेगा’ और ‘मनमोहन सिंह अमर रहें’, अशा घोषणा देत होते. सिंग यांचे पार्थिव ज्या वाहनात ठेवण्यात आले होते, त्या गाडीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सिंह यांचे कुटुंबीय आणि काँग्रेसचे काही नेते बसले होते. अंत्यसंस्कारापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालय '२४ अकबर रोड' येथे ठेवण्यात आले होते, जिथे सोनिया गांधी, खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर त्यांचे पार्थिव निगम बोध घाटावर नेण्यात आले. तेथे त्यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
डॉ. सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. मात्र, डॉ. सिंग यांचे स्मारक ट्रस्ट स्थापन करून उभारले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
डॉ. सिंग २००४ ते २०१४ या काळात दोनवेळा देशाचे पंतप्रधान होते. यापूर्वी १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी देशात उदार आर्थिक सुधारणा राबविल्या, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यांनी १९५४ मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए आणि केंब्रिजमधून प्रथम श्रेणी अर्थशास्त्र (ऑनर्स) आणि १९६२ मध्ये ऑक्सफर्डमधून डीफिल पूर्ण केले.
मनमोहन सिंग १९७१ मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार, १९७२ मध्ये अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि १९८० ते ८२ या काळात नियोजन आयोगाचे सदस्य होते. १९८२ ते १९८५ या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि १९८५ मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापकही होते.