मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  manmohan singh birthday : मनमोहन सिंग यांच्या 'या' पाच निर्णयांनी बदलला देशाचा चेहरामोहरा

manmohan singh birthday : मनमोहन सिंग यांच्या 'या' पाच निर्णयांनी बदलला देशाचा चेहरामोहरा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 26, 2023 04:52 PM IST

Manmohan Singh Birthday : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज आपला ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Manmohan Singh
Manmohan Singh

Manmohan Singh Birthday : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जगाची कवाडे उघडणारे प्रख्यात अर्थतज्ज्ञ, माजी अर्थमंत्री व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

तब्बल १० वर्षे देशाचं पंतप्रधानपद भूषविणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा आढावा देखील या निमित्तानं घेतला जात आहे. मनमोहन सिंग हे देशाचे १३ वे पंतप्रधान होते. पंतप्रधानपदी येण्यापूर्वी त्यांनी १९९१ ते १९९६ या काळात भारताचे अर्थमंत्री पद भूषवलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना

आजची पिढी त्यांना प्रामुख्यानं माजी पंतप्रधान म्हणून ओळखत असली तरी त्यांचं कार्यकर्तृत्व या पदापुरतं मर्यादित नाही. अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या राजकीय व आर्थिक जीवनावर आपला ठसा उमटवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला नेहरू युगातील समाजवादी अर्थव्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर काढण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यात कळीच्या ठरलेल्या त्यांच्या निर्णयावर नजर टाकणं आजच्या दिवशी औचित्याचं ठरेल.

आर्थिक उदारीकरण (१९९१)

पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात १९९१ मध्ये डॉ. सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. अर्थमंत्री म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा राबवल्या. त्यात व्यापारातील अडथळे कमी करणं, लायसन्स राज नष्ट करणं आणि विदेशी गुंतवणुकीसाठी प्रमुख क्षेत्रं खुली करणं याचा समावेश होता. या निर्णयांमुळं भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली.

पंतप्रधान पदाच्या काळातही मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची गती थांबू दिली नाही. त्यांच्या आर्थिक धोरण, राजनैतिक संबंध, सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांमध्ये भरीव प्रगती झाली.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA)

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला. कालांतरानं त्याचं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) असं नामकरण करण्यात आलं. ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणं. त्याद्वारे ग्रामीण भागातील गरिबी आणि बेरोजगारी दूर करणं हा या सामाजिक उपक्रमाचा उद्देश होता.

माहिती अधिकार कायदा (RTI)

मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळात माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हा कायदा भारतीय नागरिकांना सरकारी एजन्सी आणि संस्थांकडून माहितीची विनंती करण्याचा अधिकार देतो. सार्वजनिक प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून हा कायदा काम करतो.

भारत-अमेरिका नागरी आण्विक करार (Indo-US Civil Nuclear Agreement)

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताच्या परराष्ट्र धोरणातही अनेक बदल झाले. भारत-अमेरिका नागरी अणु करार हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा करार होता. या ऐतिहासिक करारामुळं भारत आणि अमेरिकेतील नागरी आण्विक सहकार्य सुलभ झालं. भारताला नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आण्विक तंत्रज्ञान व इंधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (NPT) स्वाक्षरी न करताही भारतानं हे सगळं पदरात पाडून घेतलं.

IPL_Entry_Point

विभाग