मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mankind Pharma: कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा आयपीओ येतोय; गुंतवणुकीची मोठी संधी

Mankind Pharma: कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा आयपीओ येतोय; गुंतवणुकीची मोठी संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 16, 2022 05:13 PM IST

Mankind Pharma IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मॅनकाइंड फार्माचा आयपीओ लवकरच येतोय.

IPO
IPO

Mankind Pharma IPO: गेल्या वर्षभरात आलेल्या आयपीओंपैकी बहुतेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून दिले आहेत. त्यामुळं आयपीओंच्या बाबतीत गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच आता मॅनकाइंड फार्मा कंपनीचा आयपीओ बाजारात धडकणार आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे.

फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली मॅकाइंड फार्मा मॅनफोर्स कंडोमची निर्मिती करते. ही कंपनी आता बाजारातून भागभांडवण उभारणार असून त्यासाठी आयपीओ लाँच करणार आहे. सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कंपनीनं यासाठीची आवश्यक कागदपत्रे सादरही केली आहेत.

तब्बल ४ कोटी शेअर्सची विक्री

हिंदुस्तान टाइम्स समूहाच्या Livemint वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, IPO च्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक ४ कोटींचे (४०,०५८,८४४) इक्विटी शेअर्स विक्रीसाठी काढणार आहेत. ‘मॅनकाइंड फार्मा’च्या प्रवर्तकांमध्ये रमेश जुनेजा, राजीव जुनेजा, शीतल अरोरा, रमेश जुनेजा फॅमिली ट्रस्ट, राजीव जुनेजा फॅमिली ट्रस्ट आणि प्रेम शीतल फॅमिली ट्रस्टचा समावेश आहे.

५,५०० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट

आयपीओच्या माध्यमातून ५,५०० कोटी रुपये उभारण्याचा मॅनकाइंड फार्माचा प्रयत्न आहे. देशातील फार्मा कंपन्यांशी तुलना करता हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. आयपीओच्या माध्यमातून उभी राहणारी संपूर्ण रक्कम विद्यमान भागधारकांना त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात दिली जाणार आहे. यातून कंपनीला कोणतीही रक्कम मिळणार नाही, असं खुद्द कंपनीनं सेबीकडं स्पष्ट केलं आहे.

मॅनकाइंडची पार्श्वभूमी

१९९१ मध्ये स्थापन झालेली मॅनकाइंड फार्मा ही भारतातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी आहे. ब्रँडेड जेनेरिक औषधांव्यतिरिक्त, कंपनीच्या आघाडीच्या ब्रँडमध्ये प्रेगा-न्यूज प्रेग्नन्सी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम, गॅस-ओ-फास्ट आयुर्वेदिक अँटासिड आणि मुरुमांवर उपचार करणारे औषध Acnestar यांचा समावेश आहे. ताज्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडसह देशभरात या कंपनीचे २३ उत्पादन प्रकल्प आहेत.

आर्थिक स्थिती

२०२०, २०२१ आणि २०२२ या आर्थिक वर्षांत भारतातील व्यवसायातून कंपनीला अनुक्रमे ५७८८.८० कोटी, ६,०२८ कोटी आणि ७५९४.७० कोटी इतका महसूल मिळाला होता. भारतानंतर अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांतही कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. कॅपिटल इंटरनॅशनलने २०१५ साली क्रिस्कॅपिटलकडून २०० दशलक्ष डॉलर्स देऊन मॅनकाइंडमधील ११ टक्के हिस्सा खरेदी केला. नंतर एप्रिल २०१८ मध्ये ChrysCapital ने पुन्हा अंदाजे ३५० दशलक्ष डॉलर देऊन १० टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

WhatsApp channel

विभाग