Manish Sisodia : केजरीवालांची कोंडी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी-manish sisodia sent to cbi custody for 5 days in delhi liquor policy case new delhi political news in marathi ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manish Sisodia : केजरीवालांची कोंडी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी

Manish Sisodia : केजरीवालांची कोंडी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी

Feb 27, 2023 07:34 PM IST

Manish Sisodia in CBI Custody : आम आदमी पक्षाला दिल्लीत दुसरा धक्का बसला आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Manish Sisodia
Manish Sisodia

Manish Sisodia in CBI Custody : कथित दारू घोटाळ्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना विशेष सीबीआय न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांची अटक व त्यानंतर कोठडीत झालेली रवानगी हा आम आदमी पक्षासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणात रविवारी सीबीआयनं सिसोदिया यांची तब्बल ९ तास चौकशी केली. त्यानंतपर त्यांना अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर ४ मार्च रोजी सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्ष अधिकच आक्रमक झाला असून भाजपच्या कार्यालयाला घेराव घालण्याची रणनीती ‘आप’नं आखल्याचं समजतं. त्यामुळं दिल्लीत मोठा राजकीय राडा होण्याची शक्यता आहे.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये मनीष सिसोदिया यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी १७ ऑक्टोबर रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आरोपपत्रात सिसोदिया यांचं नाव नव्हतं. मात्र, त्यांच्यासह अन्य संशयित आरोपींविरुद्ध तपास सुरू होता.

दिल्ली सरकारनं २०२१-२२ साली आणलेल्या उत्पादन शुल्क धोरणाच्या आखणीत व अंमलबजावणीत नियमितता असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. आम आदमी पक्षाशी संबंधित लोकांना लाभ मिळवून देण्याचा या धोरणाचा उद्देश होता, असाही ठपका सीबीआयनं ठेवला आहे. चौकशी दरम्यान सिसोदिया यांनी दिलेल्या उत्तरांमुळं सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही. शिवाय, चौकशीत सिसोदिया सहकार्य करत नव्हते असा सीबीआयचा दावा होता. त्यामुळंच त्यांना अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांनी अनेक प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि पुरावे दाखवूनही तपासात सहकार्य केलं नाही, त्यामुळं त्यांना अटक करण्यात आली, असं सीबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

 

Whats_app_banner