manipur violence news update : मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नसून काही दिवसांच्या शांततेनंतर आता पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात बुधवारी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. गोळीबाराची घटना जिल्ह्यातील कुंबी आणि थौबल जिल्ह्यातील वांगू परिसरात घडल्या. ज्या भागात गोळीबार झाला त्या भागाजवळ आले काढणीसाठी गेलेले चार नागरीक बेपत्ता झाले आहेत.
स्थानिक वृत्तानुसार गोळीबारापूर्वी मोर्टारचे सहा राउंड फायर करण्यात आले. यामुळे तणाव वाढला. सुरक्षा दलांनी तातडीने दखल घेत परिसरात बंदोबस्त वाढवला असून प्रत्येक चौकात नजर ठेवण्यात येत आहे. मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात बुधवारी गोळीबार आणि बॉम्बस्फोटाच्या घटना समोर आल्या आहेत. यात चार जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ओइनम रोमेन मीतेई (वय ४५), अहंथेम दारा मैतेई (वय ५६), थोडम इबोमचा मेईतेई (वय ५३) आणि थोडम आनंद मैतेई (वय २७). अशी बेपत्ता झालेल्याची नावे आहेत. या प्रकरणी कुंभी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याआधीही नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला थौबलच्या लिलाँग भागात अज्ञात सशस्त्र हल्लेखोर आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात चार नागरीक ठार झाले होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या संघर्षानंतर काही काळ शांतता होती. मात्र, अधून मधून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. यात आतापर्यंत १८० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मैतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ राज्यातील डोंगरी भागातील जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हा संघर्ष उफाळून आला होता. कुकी गावकऱ्यांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून झालेल्या तणावापूर्वी हिंसाचार झाला होता.