Manipur Violence : मणिपूर अद्याप शांतता प्रस्थापित झालेली नाही. दहशतवाद्यांनी सहा नांगरिकांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या सहा पैकी तिघांचे मृतदेह नदीजवळ सापडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. जमावाने शनिवारी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या निवासस्थानांवर हल्ला केला. या घटनेमुळे सरकारने पुन्हा पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. संतप्त जमावाने आधी राज्यातील नेत्यांच्या घरांवर हल्ला केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. परिस्थिती चिघळताच सुरक्षा दलांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.
याशिवाय राज्याच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या जावयासह सहा पैकी तीन आमदारांच्या घरांची तोडफोड केली आणि त्यांच्या मालमत्तेला आग लावली, तर इंफाळच्या विविध भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराचा वापर केला.
मणिपूर-आसाम सीमेवरील जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ शुक्रवारी रात्री जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता व्यक्तींपैकी तिघांचे मृतदेह सापडले. आंदोलनकर्त्यांनी ज्या मंत्र्यांच्या निवासस्थानांवर हल्ला केला, त्यात सपम रंजन, एल सुसिंद्रो सिंह आणि वाय खेमचंद यांचा समावेश आहे. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि इम्फाळ खोऱ्यातील काकचिंग जिल्ह्यांमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केल्याने राज्य प्रशासनाने शनिवारी सायंकाळी सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लाम्फळ सनकाथेल येथील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला.
लॅम्पेल सनकेन्थेल विकास प्राधिकरणाचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी पत्रकारांना सांगितले की, "सपम यांनी आम्हाला आश्वासन दिले की तीन लोकांच्या हत्येशी संबंधित मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि जर सरकार लोकभावनांचा आदर करण्यात अपयशी ठरले तर मंत्री राजीनामा देतील." आंदोलकांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुराई भागातील ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्या निवासस्थानावरही छापा टाकला. सायंकाळी जमावाने त्यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराचा मारा करावा लागला.
आंदोलकांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई भागातील महापालिका प्रशासनाचे गृहनिर्माण मंत्री वाय. खेमचंद यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात भाजप आमदार आर. के. इमो यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. इमो हे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे जावई आहेत. सरकारने योग्य ती कारवाई करावी आणि २४ तासांत दोषींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जमावाने भाजप आमदाराच्या घराची तोडफोड केली आणि त्यांच्या मालमत्तेला आग लावली. इंफाळ पश्चिमेकडील तेरा येथील भाजपचे आमदार सपम कुंजाकेसौर यांच्या निवासस्थानात आंदोलकांनी घुसून त्यांच्या मालमत्तेची तोडफोड केली. आमदार निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनालाही आग लावण्यात आली.
भाजपचे आणखी एक आमदार जयकिशन सिंह यांच्या थांगमेईबंद येथील निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली. वांगखेई मतदारसंघातील जनता दल युनायटेडचे आमदार टी. अरुण आणि लंगथबलचे भाजप आमदार करम श्याम यांच्या निवासस्थानालाही आंदोलकांनी घेराव घातला. दरम्यान, बिष्णुपूर जिल्ह्यातील एरेंगबाम मॅनिंग भागात संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांसोबत चकमक झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
संबंधित बातम्या