मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Landslide: मणिपूरमध्ये भूस्खलन; सात जवानांसह १४ ठार, ६० ढिगाऱ्याखाली

Manipur Landslide: मणिपूरमध्ये भूस्खलन; सात जवानांसह १४ ठार, ६० ढिगाऱ्याखाली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 01, 2022 09:57 AM IST

मणिपूरमध्ये भूस्खलनानंतर सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू असून अद्याप ६० जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

मणिपूरमध्ये भूस्खलन, बचावकार्य सुरू
मणिपूरमध्ये भूस्खलन, बचावकार्य सुरू (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

मणिपूरमध्ये (Manipur) पावसामुळे गुरुवारी भूस्खलन (Manipur Landslide) झाले. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून ७ जवानांचा यात समावेश आहे. अद्यापही मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक आहेत. बुधवारी मध्यरात्री नोनी जिल्ह्यातील तुपुल यार्ड रेल्वे कन्स्ट्रक्शन कॅम्प शेजारी ही दुर्घटना घडली. वातावरण प्रतिकूल असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ जणांना बाहेर काढले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही जवळपास ६० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून यात ३० हून जास्त जवान आहेत.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १३ जवानांसह ५ नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. प्रतिकूल वातावरणातही आसाम रायफल्स आणि प्रादेशिक सेनेच्या पथकांनी बचावकार्य सुरू ठेवलं आहे. रात्रभर बचावकार्य सुरुच होतं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांननी या घटनेबाबत मुख्य मंत्री एन बिरेन सिंह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याची चर्चा केली. त्यांनी सांगितले की घटनास्थळी एनडीआरएफची पथके पाठवण्यात आली आहेत. तसंच बचावकार्य वेगाने केले जात आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावून घटनेचा आढावा घेतला. तसंच यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

भूस्खलनानंतर मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिग खाली आल्यानं नदीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे पाणी परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. वाढता धोका पाहता नागरिकांना नदी किनारी जाऊ नये असं सांगितलं आहे. तसंच नदीच्या आजुबाजूला राहणाऱ्या लोकांनीही तात्पुरते इतरत्र स्थलांतर करावे असंही सांगण्यात आलं आहे. इजेई नदीच्या पात्रातच भूस्खलनानंतर मातीचा ढिग पडला आहे. यामुळे नदीचा प्रवाह रोखल्यानं पाणी साठून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या