नितीन गडकरींना धमकी देणारा आहे ‘डी’ कंपनीचा सदस्य, भोगतोय मृत्यूदंडाची शिक्षा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकीचा कॉल करणारा दाऊद टोळीतील सदस्य असल्याचे व तो हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा भोगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ताज्या माहितीनुसार ही व्यक्ती खुनी असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कर्नाटकातील बेळगावी शहरातील कैदी आहे. त्याने स्वत:ला दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले असून जयेश पुजारी असे या व्यक्तीचे नाव आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विशेष म्हणजे या व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याशिवाय १०० कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, धमकी देणाऱ्या जयेश पुजारीला एका खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो एक कुख्यात गुंड आहे जो २०१६ मध्ये तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली.ते म्हणाले की, पुजारीने यापूर्वी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकीचे फोन केले होते.
पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की,या व्यक्तीने गडकरींच्या कार्यालयातील फोन ऑपरेटरला सांगितले की तो डी कंपनीचा (दाऊद इब्राहिम टोळीचा) सदस्य आहे आणि त्याने गडकरींकडे १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मागणी मान्य न केल्यास मंत्र्यांना बॉम्बने इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती. फोन करणार्याने पैसे देण्यासाठी कर्नाटकातील आपला फोन नंबर आणि पत्ता दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी त्याने कारागृहातून मोबाईल फोनद्वारे फोन केल्याचे दिसते.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक रविवारी रात्री उशिरा बेळगावात पोहोचले. अधिकाऱ्याने सांगितले की, टीम तुरुंग अधिकाऱ्यांकडेसोमवारी पुजारीची चौकशी करण्याची परवानगी देण्याची विनंती करेल.एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गडकरींच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी ११.२५ ते १२.३० च्या दरम्यान तीन धमकीचे फोन आले. यानंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थान आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
संबंधित बातम्या