आंध्र प्रदेशातील रायदुर्गम येथील एका चित्रपटगृहात 'पुष्पा २' या चित्रपटाच्या मॅटिनी शोदरम्यान एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. कल्याणदुर्गमचे पोलिस उपअधीक्षक रवी बाबू यांनी सांगितले की, हरिजना मदनप्पा असे मृत व्यक्तीचे नाव असून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नाट्यगृहाच्या सफाई कर्मचाऱ्यांना तो मृतावस्थेत आढळला.
हरिजना यांचा मृत्यू केव्हा झाला हे समजू शकले नसले तरी मॅटिनी शोनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांना तो मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनप्पा हे मद्यधुंद अवस्थेत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मॅटिनी शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती चार मुलांचा पिता असून त्याला दारूचे व्यसन होते. तो आधीच मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने थिएटरमध्ये जास्त मद्यपान केले होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ८२९ कोटींची कमाई केली असून जगभरात सर्वात जलद ८०० कोटींचा टप्पा ओलांडणारा तो भारतीय चित्रपट ठरला आहे. निर्मात्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्याही भूमिका आहेत.
प्रॉडक्शन हाऊस मैत्री मुव्हीजने आपल्या अधिकृत 'एक्स' पेजवर या वीकेंडच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे.
चित्रपटाच्या प्रिमीयरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटूंबाची माफी मागत त्यांनी २५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
४ डिसेंबर रोजी अर्जुन त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी आणि सहकलाकार रश्मिका मंदाना सोबत थिएटरमध्ये गेला होता, तेव्हा त्याला भेटण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. यात एक महिला आणि तिचा लहान मुलगा जखमी होऊन बेशुद्ध पडले. महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा पथक आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या