अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!

Dec 04, 2024 02:34 PM IST

Golden Temple Firing : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सुखबीर बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न, अटक

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबार, माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबार, माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले! (PTI)

Sukhbir Singh Badal News : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते श्री अकाल तख्त साहिब यांनी सुनावलेल्या धार्मिक शिक्षेनुसार सेवा करत असताना सुवर्ण मंदिर परिसरात बुधवारी गोळ्या झाडण्यात आल्या. सुखबीर सिंग बादल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. मात्र ते थोडक्यात वाचले. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

नारायण सिंह चौरा असं या हल्लेखोराचं नाव असून तो एकेकाळचा दहशतवादी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो भूमिगत होता.

आरोपी नारायण सिंह चौरा याला अटक
आरोपी नारायण सिंह चौरा याला अटक (Sameer Sehgal/Hindustan Times)

घटनेच्या वेळी नारायणसिंह चौरा सुखबीर सिंग बादल यांच्या जवळ उभा होता. सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार करताना जवळच उभ्या असलेल्या एका सेवादारानं चौराला धक्का दिला. त्यामुळं सुखबीर सिंग बादल बचावले.

सुखबीर बादल यांना धार्मिक शिक्षा

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या सरकारनं २००७ ते २०१७ या काळात केलेल्या चुकांसाठी बादल आणि इतर नेत्यांना 'तन्खा' (धार्मिक शिक्षा) सुनावताना अकाल तख्तमधील शीख धर्मगुरूंनी सोमवारी ज्येष्ठ अकाली नेत्याला सेवादार म्हणून काम करण्याचे आणि सुवर्ण मंदिरात भांडी धुण्याचे आणि शूज स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. ही शिक्षा भोगण्यासाठी बादल व त्यांचे सहकारी सध्या सुवर्ण मंदिरात गेले आहेत.

एका हातात भाला घेऊन निळ्या रंगाच्या सेवादार गणवेशात असलेले बादल मंगळवारी आपल्या व्हीलचेअरवर सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिक्षा भोगत होते. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

अकाली नेते सुखदेवसिंग ढिंडसा यांनाही वयोमानामुळं व्हीलचेअरवर बसवण्यात आलं होतं, तर पंजाबचे माजी मंत्री बिक्रमसिंग मजीठिया आणि दलजीतसिंग चीमा यांनी भांडी धुतली.

बादल आणि ढिंडसा यांच्या गळ्यात छोटे छोटे फलक लावण्यात आले होते. त्यात त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी एक तास सेवादार म्हणून काम पाहिलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर