Delhi Flyover traffic Video: इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी एका व्यक्तीने दिल्ली उड्डाणपुलावर वाहतुकीला अडथळा आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापची लाट उसळली. अनेकांनी संबधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एका व्यक्तीने ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, दिल्लीतील पश्चिम विहार उड्डाणपुलावर एका तरुणाने वाहतूक थांबवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रील बनवण्यासाठी असो किंवा प्रसिद्धीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तरुण पश्चिम विहारमधील उड्डाणपुलावर वाहने थांबवून निष्काळजीपणे स्टंट करताना दिसला". हा व्हिडिओ शेअर करताना संबंधित व्यक्तीने पोलिसांना टॅग केले आहे. \
एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जवळपास दीड हजार लोकांनी या व्हिडिओला लाइक्स केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यासाठी अनेकांनी दिल्ली पोलिसांनी टॅग केले आहे.
बहुतांश लोकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, काही लोकांना कायद्याची अजिबात भीती वाटत नाही. तर, दुसऱ्या युजरने अभ्यास सोडा, सोशल मीडियाचा वापर करा आणि लवकर प्रसिद्ध व्हा, असा टोमणा मारला आहे. अशा बुद्धीहीन लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एका युजरने मागणी केली आहे.