जगात अनेक हिंस्त्र पशू आहेत, ज्यांच्या आसपास जाणेही धोकादायक असते. असाच एक जीव म्हणजे पाण्यात राहणारी मगर. एखाद्या प्राणीसंग्रहालयात जरी मगर असली तरी पिंजऱ्याच्या बाहेरूनच तिला खायला टाकले जाते. कारण मगर कधीही हल्ला करून जीव घेऊ शकते. मात्र सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एका तरुणाचा मगरीसोबत थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एका व्यक्तीने आपल्या उघड्या हातांनी एका मोठ्या मगरीला खाऊ घातल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि संरक्षणवादी ख्रिस्तोफर जिलेट यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हा धाडसी क्षण दाखवण्यात आला आहे. माणूस शांतपणे आपल्या हातांशिवाय काहीही न वापरता एका छोट्या तलावातील विशाल मगरीच्या तोंडात कोणत्या तरी प्राण्याचा लेग पीस देत आहे.
क्लिपमध्ये महाकाय मगर हळूहळू जवळ येते, तिचे जबडे उघडे असतात, आणि तो माणूस निर्भयपणे त्याला खाऊ घालण्यासाठी हात पुढे करतो. मगर लेग पीस झटकन खाऊन टाकते. परंतु जिलेट, यावेळी कोणतीही भीती न बाळगता शांतपणे उभा राहतो.
या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियां उमटत आहेत. अनेकांनी यात असलेल्या अत्यंत जोखमीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एवढ्या शक्तिशाली प्राण्याला तो ज्या शांततेने हाताळतो त्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले असले, तरी यावर अनेकांनी टीका केली आहे.
सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एक जण म्हणाला, "या माणसाला पोलादाच्या नसा आहेत! मी अशा मगरीच्या जवळ कधीच जाऊ शकणार नाही." दुसऱ्याने म्हटले की, कोणी असा जीव का धोक्यात घालेल? नुसतं बघून भीती वाटते!" आणखी एकाने म्हटलं, "हा माणूस स्पष्टपणे कुशल आहे पण तरीही तो वेडा आहे." आणखी एकाने लिहिले की, "तुम्हाला त्याच्या शौर्याचा आदर करावा लागेल पण हे बेफिकीर वाटते.
काहींनी त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, "ज्या प्रकारे त्याने सहजपणे मगरीला खाऊ घातले ते आश्चर्यकारक आहे. इतरांना काळजी वाटत होती. एका युजरने म्हटले आहे की, "हे वागने चुकीचे होऊ शकते. मला आशा आहे की घरी कोणीही असा प्रयत्न करणार नाही."