आज अयोध्येत राम मंदिराचे भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली गेली. यानिमित्त देशभर दीपोत्सव साजरा केला गेला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हरियाणामधील भिवानी येथे सोमवार दुपारच्या सुमारास रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी एक दुखद घटना समोर आली.
रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका करत असलेल्या कलाकाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, भूमिका सादर करताना अचानक खाली कोसळला तो परत उठलाच नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी येथील जैन चौकात रामलीला कार्यक्रम सुरू होता. अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा केल्यानिमित्त स्थानिक समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही घटना सोमवारी दुपारची आहे. रामलीला सुरु होता त्याचवेळी हनुमानची भूमिका करणाऱ्या हरीश मेहता यांचा मृत्यू झाला.
व्हिडिओमध्ये दिसते की, हरीश मेहता प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ कोसळतात. पहिल्यांदा वाटते की, भूमिका करताना भावुक होत हनुमान रामाच्या चरणांवर लीन होत आहेत. मात्र खूप वेळ झाली तरी काहीच हालचाल न झाल्यानं काहीतरी दु:खद घडल्याचं समोर आलं.
लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी सांगितले की, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.