Tirupati Stampede : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात वैकुंठ गेटवर दर्शनासाठी टोकन गोळा करण्याच्या प्रयत्नात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भविकांचा मृत्यू झाला. तर ४० पेक्षा अधिक जखमी झाले. तिरुपतीतील विष्णू निवास आणि रामानायडू स्कूल परिसरात ही घटना घडली. यातील गंभीर जखमींना रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीला चेंगराचेंगरीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजलं. एका वृत्त वाहिणीशी बोलतांना या व्यक्तीला अश्रु अनावर झाले.
व्यंकटेश असे या व्यक्तिचे नाव असून शांती असे चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या या व्यक्तीच्या पत्नीचे नाव आहे. तिरुपती एटतहे झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ त्याने पाहिला. तेव्हा यात त्याच्या पत्नीचा देखील मृत्यू झाल्याचे त्याला कळाले. एनडीटीव्हीशी बोलताना व्यंकटेश म्हणाला, तिरुपती येथे झालेल्या चेंगराचेंगरीत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही बाब मला व्हायरल व्हिडिओमधून कळली. :
वेंकटेश, त्यांची पत्नी शांती व त्यांचा मुलगा तिरुपती येथील वैकुंठ दर्शनासाठी तिरूपती येथे आले होते. ते मूळचे विशाखापट्टणम येथील आहेत. देवाचे दर्शन होईल या आशेमुळे ते आनंदी होते. मात्र, पुढे घडणाऱ्या गोष्टींबाबत ते अनभिज्ञ होते.
विष्णू निवासमजवळ विशेष 'दर्शन' घेण्यासाठी लागलेल्या रांगेत हे कुटुंब देखील उपस्थित होते. यावेळी टोकनसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांपैकी काही महिलांना अस्वस्थ वाटू लागले. अधिकाऱ्यांनी तिला बाहेर काढण्यासाठी दरवाजे उघडले. यामुळे अचानक गोंधळ उडाला. रांगेत उभे असलेल्यांना वाटले की टोकनसाठी दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यांनी या दारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. यात ६ जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये व्यंकटेशची पत्नी शांती देखील होती.
आज सकाळी वेंकटेश श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया सरकारी सामान्य रुग्णालयाबाहेर उभा होता. या दुर्घटनेत तो देखील जखमी झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा मृतांमध्ये त्याची पत्नी शांती असल्याचं व्यंकटेश यांना कळलं. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या घटनेबद्दल पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. व्यंकटेश म्हणाले, पोलिस व्यवस्थापन खूपच वाईट होते. माझी पत्नी रांगेत पुढे होती. आम्हाला ती पडल्याचे देखील कळले नाही. चेंगराचेंगरीनंतर, आम्ही रुग्णालयांमध्ये तिचा शोध घेतला, परंतु आम्हाला ती सापडली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून आम्हाला तिच्या मृत्यूची माहिती मिळाली," असे व्यंकटेशने एनडीटीव्हीला सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. एस. वेंकटेश्वर म्हणाले, काउंटरवर पुरेशा संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. "ही (घटना) दुर्दैवी आहे. मंदिराचे कामकाज सांभाळणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाने या घटनेमागे काही कटकारस्थान असल्याचा इन्कार केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आज तिरुपतीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. "तिरुपती, आंध्र प्रदेश येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुख:त सहभागी असून या घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेश सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे," असे देखहील पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून येत आहे. घटनास्थळी मोठा गोंधळ झाला होता. यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जखमीना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या व्हिडिओमध्ये अनेक भाविक जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचं दिसत आहे. पोलिस व इतर काही जण जखमी व बेशुद्ध झालेल्यांना सीपीआर देताना दिसत आहेत. तर काही भाविकांना खुर्चीवर बसून सुरक्षित स्थळी नेले जात असतांना दिसत आहे. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने १० जानेवारी रोजी शुभ वैकुंठ एकादशीच्या दिवशी टोकनसाठी अलिपिरी, श्रीनिवासपुरम आणि इतर भागातील नऊ केंद्रांवर ९४ काउंटर उघडले होते.
संबंधित बातम्या