मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शेकोटी पेटवणे बेतले जिवावर! पती-पत्नीचा गुदमरून मृत्यू, तर दोन महिन्यांचे बाळ आयसीयूत

शेकोटी पेटवणे बेतले जिवावर! पती-पत्नीचा गुदमरून मृत्यू, तर दोन महिन्यांचे बाळ आयसीयूत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 11, 2024 07:52 AM IST

Delhi Dwarka news : राजधानी दिल्लीत कडक्याची थंडी पडत असून या थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात शेकोटी पेटवने पती पत्नीच्या जिवावर बेतले आहे. घरात मोठा धूर झाल्याने गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.

husband wife died due to smoke in Delhi
husband wife died due to smoke in Delhi

husband wife died due to smoke in Delhi: राजधानी दिल्ली येथे सध्या कडक्याची थंडी पडत आहे. या थंडीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरीक शेकोट्यांचा आधार घेतांना दिसत आहेत. मात्र, हीच शेकोटी त्यांच्या जिवावर बेतत असल्याची घटना दिल्ली येथे उघडकीस आली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात थंडी पासून वाचण्यासाठी घरात शेकोटी पेटवण्यात आली. यामुळे घरात मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने पती आणि पत्नीचा मृत्यू झाला तर दोन महिन्यांच्या बाळाला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Indian Railway : महत्वाची बातमी! पुण्यातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या १६ गाड्या २५ दिवस रद्द; 'हे' आहे कारण

मानव (वय २३) आणि त्याची पत्नी नेहा (वय २२) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जोडप्याचे नाव आहे. तर त्यांचा २ महिन्यांचा मुलगा आयुष सध्या आयसीयूत उपचार घेत आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ही घटना धूरामुळे झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका परिसरात कडाक्याची थंडी नागरीक अनुभवत आहेत. दरम्यान, या थंडीपासून बचाव करण्यासाठी मानवने घरात शेकोटी पेटवली होती. मात्र, घरात मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने व धूर बाहेर जाण्यास रस्ता नसल्यामुळे दोघांचाही श्वास गुदमरला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी त्यांच्या घरी आले. शेजाऱ्याने खिडकी तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नी दोघेही बेशुद्ध पडले होते. यानंतर शेजाऱ्यांनी सकाळी ९.३० च्या सुमारास पोलिसांना द्वारका भागातील सेक्टर 23 मधील एका खोलीत एक मूल रडत असून त्याचे आई-वडील खोलीत बेशुद्ध पडले असल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मानव ज्या घरात राहत होता ते घर एका व्यावसायिकाचे आहे. पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी पंचनामा केला. यात धूरांमुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवले आहेत.

manipur violence : मणीपुर पेटलेलेच! हिंसाचार, गोळीबार आणि बॉम्बस्फोटांमुळे पुन्हा तणाव; ४ नागरिकही बेपत्ता

द्वारका जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे मूळचे उत्तर प्रदेशातील महोबा येथील आहेत. ते द्वारका येथील शहीद भगतसिंग एन्क्लेव्ह, पोचनपूर येथे राहत होते. मानवची आई गुलाब राणी ही त्यांच्या १२ वर्षांच्या मुलासोबत घरापासून १०० मीटर दूर अंतरावर राहते. मानवचा भाऊ गोविंद याने सांगितले की, तो गेल्या ६ वर्षांपासून दिल्लीत राहत होता. सुमारे ३ वर्षांपूर्वी त्याचा पालम येथे राहणाऱ्या नेहासोबत प्रेमविवाह झाला होता.

तज्ञ काय म्हणतात

डॉक्टरांच्या मते, चुलीमध्ये वापरण्यात येणारा कोळसा किंवा लाकूड जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइडशिवाय अनेक विषारी वायू बाहेर पडतात. बंद खोलीत कोळसा जळत असेल तर कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजन कमी होतो. हा कार्बन थेट मेंदूवर परिणाम करतो आणि श्वासाद्वारे शरीरात पसरतो. यामुळे खोलीत झोपलेली व्यक्ती बेशुद्ध पडते.

ही खबरदारी घ्या

- हिवाळ्यात शेकोटी वापरताना, खोलीतून धूर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ठेवावा. खोलीत मोठ्या खिडक्या नसल्यास, छोट्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

- उबदार ठेवण्यासाठी जळत्या शेकोटीजवळ झोपू नका.

- जर तुम्ही खोलीत शेकोटी पेटवून झोपत असाल, तर तुमच्या जवळ पाण्याची बादली किंवा इतर भांड्यात पाणी ठेवा. यामुळे आग लागल्यास ती विझवणे सोपे जाईल.

- शेकोटी पेटवल्यास खोलीत जमिनीवर झोपणे टाळावे.

- शेकोटीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू, ज्वलनशील पदार्थ, कपडे आणि कोणतेही रसायन इत्यादी ठेवणे टाळावे.

- दमा किंवा श्वसनाच्या रुग्णांनी खोलीतील हीटरचा किंवा शेकोटीचा अतिवापर करू नये.

- हीटर घरात कोणत्याही ठिकाणी किंवा खोलीत योग्य अंतरावर ठेवावा जेणेकरून त्याचा थेट संपर्क डोळ्यांच्या संपर्कात येणार नाही.

WhatsApp channel