Crime News in Marathi : जेवणाच्या ताटाजवळ शिंकल्याच्या रागातून एका व्यक्तीनं रूममेटवर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे. मॅसॅच्युसेट्समध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉबर्ट लोम्बार्डी (वय ६५) असं आरोपीचं नाव आहे. मार्शफिल्ड येथील घरी सुट्टीच्या जेवणाच्या तयारीवरून झालेल्या भांडणादरम्यान लोम्बार्डी यानं फ्रँक ग्रिसवोल्ड (८०) यांचा खून केला.
मार्शफिल्ड पोलिसांना ९११ क्रमांकावर एक कॉल आला. अमूक अमूक घरात किचनच्या फरशीवर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडली आहे. पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांना ग्रिसवोल्डच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचं आढळून आलं आणि त्याच्या कपाळावर जखम आणि मानेला फ्रॅक्चर देखील दिसलं. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला.
लोम्बार्डी आणि ग्रीसवोल्ड यांनी सुट्टीच्या दिवशी विशेष जेवणाचा बेत आखला होता. मात्र, ग्रीसवोल्ड सतत शिंकत असल्यामुळं लोम्बार्डी त्याला किचनजवळ येऊ देत नव्हता. तू स्वयंपाकाला स्पर्श करायचा नाही असं त्यानं बजावलं. तरीही ग्रीसवोल्ड तिथं गेला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी लोम्बार्डीनं ग्रीसवोल्ड जोरदार धक्का दिला. वृद्ध ग्रीसवोल्ड या धक्क्यामुळं जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. डोक्याला मार लागल्यानं त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घाबरलेल्या लोम्बार्डीनं स्वत:च ९११ वर फोन केला आणि नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. ६० वर्षांवरील व्यक्तीवर हल्ला आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००१ पासून हे दोघेही एकत्र राहत होते. २००८ साली त्यांनी मार्शफिल्डमध्ये घर भाड्यानं घेतलं होतं. तेव्हापासून ते तिथंच होते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.