प्रेयसीने आपल्या भावाशीच लग्न केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्यासह तिच्या कुटूंबातील तीन जणांची हत्या केली आहे. कर्नाटक पोलिसांनी या सनकी प्रियकराला अटक केली आहे. त्याने एकाच कुटंबातील तीन जणांची हत्या केली. ही घटना कोप्पल जिल्ह्यातील होसलिंगपुरा येथे घडली. आसिफ असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी होसपेटमधील रहिवासी आहे. त्यांनी २८ वर्षीय प्रेयसी वसंता, तिची आई राजेश्वरी (५०) आणि तिचा मुलगा साई धर्मतेज (वय ५) यांची हत्या केली. तिघांचे मृतदेह होसलिंगपुरा येथील त्यांच्या घरात आढळले. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, आंध्र प्रदेश राज्यातील मूळ रहिवाशी असलेली वसंता आपल्या पतीपासून विभक्त रहात होती. तिला पाच वर्षाचा एक मुलगा आहे. वसंता मुलगा व आईसोबत होसलिंगपुरा येथे रहात होती. ती बाहुल्या बनवण्याच्या कारखान्यात कामाला होती. तिने सहा महिन्यापूर्वी आरोपी आसिफचा भाऊ आरिफ याच्याशी लग्न केले होते. आरिफ कधी-कधी तिला भेटायला येत होता.
पोलिसांनी सांगितले की, आसिफ आधी वसंतासोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघे लग्न करणार होते. मात्र वसंताने त्याच्या भावाशी लग्न केले. आपल्या भावाशी लग्न केल्याचे आसिफला सहन झाले नाही व त्याने तिच्यासह तिचे संपूर्ण कुटूंब संपवले. आसिफ सोमवारी सायंकाळी वसंताच्या घरी आला व त्याने आधी राजेश्वरीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ५ वर्षाच्या मुलाला संपवले. वसंता त्यावेळी कामावर गेली होती. आरोपी तिची वाट पाहात तिच्या घरीच थांबला होता. कामावरून परतताच आरोपीने तिचीही हत्या केली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसिफ आणि आरिफमध्ये लग्नावरून वाद झाला होता. कधी काळी तिघांनी होस्पेटमध्ये एकत्र काम केले होते. तिघांची हत्या केल्यानंतर आसिफ पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याला काही तासात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. सोमवारी वसंताच्या लहान बहिणीने फोन केला होता, जेव्हा कोणीच फोन उचलला नाही, तेव्हा मंगळवारी सकाळी ती घरी आली. घरात तिघांचे मृतदेह पाहून तिला धक्का बसला. राजेश्वरी आणि साई धर्मतेज यांचे मृतदेह बेडरूममध्ये पडले होते तर वसंताचा मृतदेह किचनमध्ये आढळला.