Viral Crime news : आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील एका भीषण हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी व बदला घेण्यासाठी एका बापाने कुवेतहून भारतात येत त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर परत कुवेतला जात त्याने त्याच्या आपल्या युट्यूब चॅनेलवर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या नातेवाईकानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे. त्याने त्याच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी सासरच्या मंडळींकडे ठेवले होते.
मूळचा अन्नमय जिल्ह्यातील रहिवासी असलेला मारेकरी १५ वर्षांपासून कुवेतमध्ये काम करत आहे. तो युट्युब चॅनेल देखील चालवतो. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीसह कुवेतला गेला. त्याला दोन मुले आहेत. मात्र, नंतर त्याने त्याच्या मुलीला मुलीला भारतात सासरच्या मंडळींकडे सांभाळण्यासाठी सोडले. या साठी त्याने त्यांना वेळोवेळी पैसे देखील पाठवले. वर्षभरापूर्वी त्याच्या मावशीची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने तो तिला कुवेतला घेऊन आला होता. तर त्याच्या १२ वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पत्नीच्या धाकट्या बहिणीवर सोपवली होती.
पत्नीची बहीण व तिच्या नवऱ्याने सुरुवातीला त्याच्या मुलीची चांगली काळजी घेतली. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मुलीचा सांभाळ करण्यास नकार दिला. दरम्यान मुलीला घेण्यासाठी मुलीची आई कुवैतहून अन्नमय जिल्ह्यात आली. यावेळी तिला तिच्या मावशीच्या काकांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी आई व मुलीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आरोपीला केवळ इशारा देऊन सोडून दिले, तर आई आणि मुलीला परत कुवेतला पाठले.
यानंतर वडिलांनी स्वत: आरोपीचा बदला घेण्याचं ठरवलं. मुलीचे वडील बदला घेण्यासाठी ६ डिसेंबर रोजी कुवेतहून भारतात आले. त्याने आरोपीला एकट्यात गाठत लोखंडी रॉडने त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी कुवेतला परतले. हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र कोणताही पुरावा त्यांना मिळाला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर कबुलीजबाब देणारा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत मुलीवर अत्याचार करणाऱ्याची हत्या करून बदला घेतल्याचे त्याने कबूल केले. त्याच्या या व्हिडिओमुळे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी हैराण झाले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला कुवैतहून भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संबंधित बातम्या