मध्य प्रदेश राज्यातील शहडोलमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एक चुलताच आपल्या पुतण्याचा काळ बनला. आरोपीने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. इतकेच नाही तर आपल्या वहिनीवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. सांगितले जात आहे की, आरोपीच्या वहिनीने त्याला तंबाखू देण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने हे भयंकर पाऊल उचलले आहे.
रामला कोल (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ब्योहारी पोलीस ठाणे क्षेत्रातील बरकछ गावातील असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामला कोल याने आपली वहिनी सुक्खी बाई यांच्याकडे तंबाखू मागितली होती. मात्र तिने घरात तंबाखू नसल्याचे सांगत त्याला तंबाखू देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीचा पारा चढला व त्याने वहिनीसोबतच पाच वर्षाच्या पुतण्यावरही हल्ला केला. यात चिमुकल्याचा मृत्यू झाला.
आरोपी शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वहिनीच्या घरात घुसला व त्याने झोपण्याच्या तयारीत असलेल्या चिमुकल्यावर व त्याच्या आईवर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.