Law News: दिल्लीत एकाच इमारतीत भाडेकरून म्हणून राहणाऱ्या महिलेच्या स्वच्छतागृहात आणि बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडिताने त्वरीत स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता पीडिताच्या ओळखीच्या व्यक्ती दोषी आढळून आला.
करण कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला तीन महिन्यांपूर्वी आपल्या गावी जात असताना तिने विश्वासाने आरोपीकडे आपल्या घराची चावी दिली होती. पंरतु, आरोपीने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिच्या घरातील स्वच्छतागृह आणि बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले. या महिलेचे व्हॉट्सअॅप आरोपीच्या लॅपटॉपशी लिंक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून एक स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डेड व्हिडिओ असलेले दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ७७ मध्ये अशा प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ७७ मध्ये वोयोरिजमच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. यात एखाद्या महिलेकडे पाहणे, फोटो काढणे किंवा गुपचूप व्हिडिओ बनवणे आणि व्हायरल करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला किमान एका वर्षाची शिक्षा होऊ शकतो, जी पुढील तीन वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. याव्यतिरिक्त त्याच्याकडून दंडही येईल. एखाद्या व्यक्ती दुसऱ्यांदा अशा गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्याला किमान ३ ते ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय अतिरिक्त दंडही आकारण्यात येईल.
नवीन कायदा भारतीय न्यायिक संहितेचे कलम ७७ आणि जुन्या भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ सी अनेक गोष्टी काटेकोरपणे हाताळतात. दोन्ही कायद्यांनुसार महिलांचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय काढणे आणि गुपचूप पाहणे हा देखील गुन्हा आहे. याशिवाय, संबंधित महिलेचे अश्लील फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर प्रसारीत करू शकत नाही. नव्या कायद्यात अशा प्रकरणांची व्याख्या अधिक स्पष्ट करण्यात आली. भारतीय न्यायिक संहितेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, महिलेचे फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे किंवा तिच्या संमतीशिवाय तो शेअर करणे हा देखील गुन्हा आहे.