Uttar Pradesh Uber Auto Ride News: बस, रिक्षा किंवा टॅक्सीची वाट पाहण्यापेक्षा अनेकजण ओला, उबेर यांसारखा पर्याय निवडतात. याशिवाय, रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनेत ही सेवा स्वस्त आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे ६२ रुपयांची राईड बूक केलेल्या प्रवाशाला चक्क ७. ६६ कोटी रुपयांचे बिल आले आहे. हे बिल पाहून प्रवाशाला मोठा धक्का बसला आहे. अशिष मिश्रा यांनी हा संपूर्ण प्रकार एक्सवर शेअर केला आहे.
आशिषने शेअर केलेल्या व्हिडिओत दाखवण्यात आले की, उबेरचा नियमित ग्राहक दीपकने उबेर ऑटोरिक्षा बूक केली. त्यावेळी त्याला राइडसाठी ६२ रुपये दाखवण्यात आले. परंतु, प्रवास संपल्यानंतर उबेरने दीपकला चक्क ७.६६ कोटींचं बिल पाठवले. ज्यात ट्रिप भाडे १ कोटी ६७ लाख ७४ हजार ६४७ रुपये आणि वेटिंग टाइम कॉस्ट ५ लाख ९९ हजार ९१८९ रुपये दाखवण्यात आले. हे पाहून दिपकला धक्काच बसला.
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांची लाट उसळली आहे. काहींनी या रकमेची खिल्ली उडवत त्याची तुलना मंगळाच्या सहलीच्या खर्चाशी किंवा चांद्रयान मोहिमेच्या बजेटशी केली. एका वापरकर्त्याने असे सुचवले की, रक्कम भरल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशाला जाऊ देण्यास नकार देऊ शकतो. राइड-हेलिंग सेवा वापरताना अशा धक्कादायक गोष्टी टाळण्यासाठी उबरसारख्या प्लॅटफॉर्मने अचूक बिलिंग प्रणाली सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे, असे दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.
हा व्हायरल व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत असताना, भविष्यात अशा धोकादायक घटना घडू नयेत यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे भाडे तपासणे गरजेचे आहे.