वंदे भारत एक्स्प्रेसने राणी कमलापतीहून जबलपूरला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात मृत झुरळ आढळले. ही घटना १ फेब्रुवारीला घडली. जबलपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाने पश्चिम मध्य रेल्वेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. यानंतर दोन दिवसांनी प्रवाशाने त्याचा अनुभव ट्विटरद्वारे शेअर केला. या ट्विटला उत्तर देताना आयआरसीटीसीने प्रवाशाची माफी मागितली.
प्रवाशाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी ०१/०२/२०२४ ट्रेन क्रमांक २०१७३ आरकेएमपी ते जेबीपी (वंदे भारत एक्सप्रेस) मधून प्रवास करत होतो. त्यांनी दिलेल्या जेवणाच्या पॅकेटमध्ये मृत झुरळ पाहून मला धक्काच बसला”. यासह प्रवाशाने जेवणाचे फोटोही ट्विट केले आहेत.
या ट्विटनंतर आयआरसीटीसीने प्रवाशाची माफी मागितली. आयआरसीटीसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सर, तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून संबंधित सेवा पुरवठादाराला दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय स्त्रोतावर देखरेख ही वाढवण्यात आली आहे.”
"भारतीय रेल्वेमध्ये कंत्राटदार हा राजा आहे. @RailMinIndia या कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवून त्यांना शिक्षा करण्याची काही तरी पद्धत असावी. ट्रेन कितीही चांगली असली तरी या कंत्राटदारांनी प्रवाशांचा अनुभव चव्हाट्यावर आणला आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, “चॅनेल भागीदार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन का करत आहेत हे पाहून अस्वस्थ झालो.” 'गुणवत्ता उघड केल्याबद्दल धन्यवाद, यापुढे रेल्वेत कधीही ऑर्डर देणार नाही,' अशी भावना तिसऱ्याने व्यक्त केली.