मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  vande bharat : लघवीला झालं म्हणून वंदे भारतमध्ये चढला आणि गाडीचे दरवाजे बंद झाले! पुढं काय झालं पाहा!

vande bharat : लघवीला झालं म्हणून वंदे भारतमध्ये चढला आणि गाडीचे दरवाजे बंद झाले! पुढं काय झालं पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 20, 2023 04:45 PM IST

fine for using toilet in vande bharat : वंदे भारत ट्रेनमधील शौचालयाचा वापर करण्याचं धाडस एका व्यक्तीला तब्बल ६ हजार रुपयांना पडलं आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Train

fine for using toilet in vande bharat train : 'वंदे भारत' ट्रेन देशात ठिकठिकाणी सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. मागील काही दिवसांत या ट्रेनच्या अपघातांचे आणि गाडीवर दगडफेकीचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, भोपाळमध्ये एक विचित्रच प्रकार घडला आहे. केवळ लघवी करण्यासाठी म्हणून 'वंदे भारत' ट्रेनमध्ये चढलेल्या एका व्यक्तीला ६ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. हैदराबादचे अब्दुल कादिर हे त्यांची पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलासह हैदराबादहून भोपाळला आले होते. भोपाळ स्थानकातून सिंगरौलीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी ते फलाटावर थांबले होते. त्यावेळी त्यांना लघवीला झालं. अर्जंट असल्यानं स्थानकावर शौचालय शोधण्याऐवजी ते स्थानकात आलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये चढले. ही ट्रेन इंदूरला चालली होती.

अब्दुल कादिर शौचालयात गेले खरे, मात्र ते पुन्हा येईपर्यंत ट्रेनचे दरवाजे बंद झाले होते आणि गाडी सुटली होती. त्यामुळं बिथरलेल्या अब्दुल यांनी वेगवेगळ्या डब्यात असलेले तिकीट तपासणीस आणि सुरक्षा रक्षकांना गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र, गाडी फक्त ड्रायव्हरच थांबवू शकतो असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळं त्यांनी ड्रायव्हरकडं जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना थांबण्यात आलं.

शेवटी उज्जैन स्थानकावर ट्रेन थांबल्यावर अब्दुल कादिर उतरले. मात्र, विना तिकीट ट्रेनमध्ये चढल्याबद्दल त्यांना १०१२० रुपयांचा दंड भरावा लागला. तिथून त्यांना पुन्हा भोपाळसाठी बस पकडावी लागली. त्यासाठी ७५० रुपये मोजावे लागले. अब्दुल ट्रेनमध्ये अडकल्यामुळं त्याची पत्नी आणि मुलगा काळजीत पडले. पुढं काय करायचं हे त्यांना सुचेना. त्यामुळं त्यांनी सिंगरौलीला जाणारी त्यांची ट्रेन सोडली आणि अब्दुल यांची वाट बघत बसले. ही ट्रेन सोडल्यामुळं काढलेलं चार हजार रुपयांचं त्यांचं तिकीटही वाया गेलं. वंदे भारतचं शौचालय वापरणं त्यांना तब्बल ६ हजार रुपयांना पडलं.

अब्दुल कादिर यांचा संताप

वंदे भारत गाड्यांमध्ये आपत्कालीन व्यवस्था नसल्यामुळं आपल्या कुटुंबाला मानसिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप अब्दुल कादिर यांनी केला आहे. या घटनेमुळं रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेतील त्रुटी समोर आल्याचं ते म्हणाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र त्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू होण्यापूर्वी उद्घोषणा केली जाते. दरवाजे कोणत्या दिशेला उघडतील आणि दरवाजे बंद केले जात आहेत हे सांगितलं जातं. अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांचे सुरक्षेच्या दृष्टीनं ही व्यवस्था आहे. ट्रेन थांबवण्याचा निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसारच घेतला जातो, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

WhatsApp channel

विभाग