Dr. Babasaheb Ambedkar statue vandalise in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावरील टाऊन हॉल येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमृतसर पोलिस करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती एका उंच शिडीवरून चढून हातोड्याने पुतळा तोंडतांना दिसत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट देखील केली आहे. यात मान म्हणाले की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या कुणालाही माफ केले जाणार नाही. या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. पंजाबचा बंधुभाव आणि ऐक्य बिघडवण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांना सोडले जाणार नाही, असे देखील मान म्हणाले. या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यामागे मोठं षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व पक्षाचे खासदार अमरिंदर सिंग राजा वार्डिंग म्हणाले की, यामागे मोठा कट आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी वाडिंग यांनी केली. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते तरुण चुघ यांनी व्यक्त केले.
भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, एकीकडे देशभरात बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली जात असतांना भारतीय संविधानाचा अनादर पंजाबमध्ये केला गेला. अमृतसरमध्ये एका व्यक्तीने हातोड्याने बाबासाहेब आंबेडकर यांचा ३० फूटी उंच पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत असतांना ही घटना घडणे निंदनीय आहे. दलित समाजाच्या या अपमानाला अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत.
अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनेमागील कटाचा उलगडा करण्यासाठी मागणी त्यांनी केली. प्रजासत्ताक दिनी श्री अमृतसर साहिब येथील हेरिटेज स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. या घृणास्पद कृत्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यात फुट पाडणाऱ्यांविरोधात आपण एकत्र येऊ असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा निषेध केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, दिल्लीतील मतदारांनी, विशेषत: आप, काँग्रेस आणि भाजपचा दुटप्पीपणा लक्षात घेऊन मतदान करावे. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील घडलेली ही घटना लज्जास्पद आहे. या घटनेचा कितीही निषेध केला तरी पुरेसा नाही. पंजाब सरकारने या अप्रिय घटनेकडे गांभीर्याने पाहावे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कठोर पावले उचलावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
संबंधित बातम्या