mamata banerjee : मोदींचा शपथविधी सुरू असताना ममता बॅनर्जी घरातली लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या! कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  mamata banerjee : मोदींचा शपथविधी सुरू असताना ममता बॅनर्जी घरातली लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या! कारण काय?

mamata banerjee : मोदींचा शपथविधी सुरू असताना ममता बॅनर्जी घरातली लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या! कारण काय?

Jun 18, 2024 03:35 PM IST

mamata banerjee vs Narendra modi : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना ममता बॅनर्जी घरातील लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या, अशी माहिती त्यांच्याच पक्षाच्या खासदार सागरिका घोष यांनी दिली आहे.

मोदींचा शपथविधी सुरू असताना ममता बॅनर्जी घरातल्या लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या
मोदींचा शपथविधी सुरू असताना ममता बॅनर्जी घरातल्या लाइट घालवून अंधारात बसल्या होत्या

Mamata Banerjee : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा शपथविधी सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. देश-विदेशातील हजारो पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, राजकीय संघर्षामुळं नरेंद्र मोदींवर नाराज असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्याला दांडी मारली. आता त्यांच्या विषयी नवीच माहिती समोर आली आहे.

ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या घरातील सर्व दिवे बंद केले होते आणि त्या अंधार करून बसल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष यांनी 'एक्स'वर ही माहिती दिली आहे. मोदींचं सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, त्यामुळं शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी आधीच सांगितलं होतं. तसंच, मोदींना शुभेच्छा देण्यासही नकार दिला होता.

काय आहे सागरिका घोष यांचं ट्वीट?

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा आनंद साजरा करणाऱ्या सर्वांना भारताच्या एकमेव महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळा संदेश दिला आहे. जनादेश गमावलेल्या आणि जनतेनं नाकारलेल्या 'पंतप्रधाना'च्या तथाकथित शपथविधी समारंभाच्या वेळी त्या सर्व दिवे बंद करून अंधारात बसल्या. नरेंद्र मोदी हे वाराणसीत जवळजवळ हरले, अयोध्येत हरले, पूर्णपणे स्वत:वर केंद्रित प्रचार करूनही त्यांना बहुमत मिळू शकलं नाही. मोदींना बदललं पाहिजे. भाजपनं नवा नेता निवडून द्यावा,' असं घोष यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मला खेद आहे!

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकात्यात आपल्या पक्षाच्या खासदारांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी या सरकारला शुभेच्छा देणार नाही याचा मला खेद आहे. लोकशाहीच्या तत्त्वाला हरताळ फासून, घटनाबाह्य आणि बेकायदेशीरपणे हे सरकार स्थापन होत आहे. मात्र, भाजपच्या बाजूनं मतदान न करणाऱ्या देशातील जनतेसोबत माझ्या शुभेच्छा कायम आहेत.’

भविष्यात इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू शकते, असे संकेतही त्यांनी दिले. आम्ही आज सरकार बनवणार नाही याचा अर्थ उद्याही बनवू शकणार नाही असं नाही. आम्ही योग्य संधीची वाट पाहत आहोत. देशाला बदलाची गरज आहे. कुणालाही मोदी नको आहेत, असं त्या म्हणाल्या.

भाजपचा पलटवार

भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाइट बंद केली तेव्हा त्यांच्या कुटुंबातील कोणी पाठीमागून धक्काबुक्की केली का, याची चौकशी करावी. लाईट बंद करणं त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. त्यांनी नेहमी लाइट्स चालू ठेवायला हव्यात. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना कोणी पाठीमागून ढकललं तर अडचण येईल,' अशी खोचक टीका पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार यांनी केली.

मार्च महिन्यात ममता बॅनर्जी या त्यांच्या घरी घसरून पडल्या होत्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. बॅनर्जी यांना पाठीमागून ढकलण्यात आलं होतं, असं तेव्हा एसएसकेएम रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक डॉ. मणिमय बंदोपाध्याय यांनी सांगितलं होतं. तोच धागा पकडून मजुमदार यांनी हा टोला हाणला आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर