Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत

Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत

Jan 24, 2024 04:41 PM IST

Mamata Banerjee Car Accident news : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला आज अपघात झाला. त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

Mamata Banerjee
Mamata Banerjee

Mamata Banerjee Car Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाला असून त्यात ममता बॅनर्जी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धमान येथील एका सभेत सहभागी होऊन परतत असताना हा अपघात झाला. मुख्यमंत्री ममता यांची गाडी भरधाव वेगानं जात होती. इतक्यात वाटेत एक उंच जागा आली. त्यामुळं चालकानं अचानक ब्रेक लावला. अचानक ब्रेक लागल्यानं कारमध्ये बसलेल्या लोकांचा तोल गेला. यात ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला जखम झाली.

mamata banerjee : मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढणार, इंडिया आघाडीला धक्का

दुखापत किती गंभीर?

ममता बॅनर्जी यांची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, कपाळावर किरकोळ जखम झाल्याचं बोललं जात आहे. वर्धमानमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून ममता बॅनर्जी राज्याची राजधानी कोलकाता येथे परतत होत्या.

आधी हेलिकॉप्टरनं यावं लागलं!

वर्धमान जिल्ह्यातून कोलकात्याला परतताना आधी त्या हेलिकॉप्टरनं येणार होत्या. मात्र खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही. त्यामुळं त्यांनी कारनं कोलकात्याला परतण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवासादरम्यान ही घटना घडली.

ममता बॅनर्जी पुन्हा चर्चेत

अपघाताच्या बातमीच्या आधी देखील देशभर आज ममता बॅनर्जी यांचीच चर्चा होती. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय ममतांच्या तृणमूल काँग्रेसनं घेतला आहे. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र, काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानं त्यांनी ‘एकला चलो रे’चा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी त्यांच्या निर्णयावर अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी आपल्या निर्णयापासून माघार घेतात की 'इंडिया आघाडी'ला रामराम करतात, याबद्दल राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर