Mamata Banerjee In Mumbai : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापलेल्या इंडिया आघाडीची आजपासून मुंबईत दोनदिवसीय बैठकीला सुरुवात झाली आहे. देशातील विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात येणार आहे. परंतु आता इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल?, या प्रश्नाचं उत्तर ममता बॅनर्जींनी दिलं आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी ममता यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी पुढील कार्यक्रमासाठी निघाल्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना थांबवून इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया आघाडी हीच आमच्यासाठी पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. पंतप्रधानपदासाठी आम्ही केवळ इंडियाकडे पाहत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी किंवा शरद पवार यांच्यापैकी एका नावावर इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकतं. ममता बॅनर्जींनी थेट उत्तर देणं टाळल्याने आणखी संशय बळावला आहे.
विरोधकांच्या आघाडीची आजपासून बैठक होत असतानाच सत्ताधारी एनडीएची देखील मुंबईत आज बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे विरोधकांच्या म्हणजेच इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटप आणि अन्य मुद्दे निकाली लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.