male tailor should not take measurements of women clothes : उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत. पुरुष टेलर्सना महिलांचे मोजमाप घेण्यापासून रोखण्यावरही आयोग विचार करत आहे. कोणताही पुरुष टेलर महिलांचे मोजमाप घेऊ शकत नाही, असा प्रस्ताव उत्तर प्रदेश महिला आयोगाने राज्य शासनाला पाठवला आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार करून जिम व योगा सेंटरमध्ये महिला ट्रेनर नेमण्यात यावे, असे महिला आयोगानं म्हटलं आहे. जिम आणि योगा सेंटरमध्ये डीव्हीआरसह सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावेत तर स्कूल बसमध्ये महिला सुरक्षारक्षक किंवा महिला शिक्षिका असावी, असे देखील अहोगाने म्हटलं आहे.
महिला आयोगाच्या या सूचनांवर २८ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. महिला आयोगाच्या सदस्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत विचारमंथन केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काही निर्णय घेतले. मात्र, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या प्रस्तावांची व्यवहार्यता अद्याप निश्चित झालेली नाही. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी धोरण तयार करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
उत्तर प्रदेश महिला आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, बुटीक सेंटर्सना व लेडीज टेलर्सला दुकानात सीसीटीव्ही तसेच महिलांचे मोजमाप घेण्यासाठी महिला टेलरची नेमणूक करावी लागेल. याशिवाय कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही आणि स्वच्छतागृहांची योग्य सुविधा असावी. महिलांसाठी खास कपडे आणि अॅक्सेसरीज विकणाऱ्या दुकानांनाही ग्राहकांच्या मदतीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असा प्रस्ताव आयोगाने मांडला आहे.