Accident in hardoi: उत्तर प्रदेशामधील हरदोई येथे ऑटो रिक्षा व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या ऑटोला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात हरदोई जिल्ह्यातील कोतवाली बिलग्रामच्या रोशनपूर परिसरात झाला. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
हरदोई येथील बिलग्राम कोतवाली भागात बिलग्राम कानपूर महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी रिक्षा माधवगंजहून प्रवाशांना घेऊन येत होती. रिक्षात एकूण १५ जण होते. ओव्हरलोड असूनही रिक्षाचा वेग तुफान होता. ट्रक माधोगंज शहरातून बिलग्रामच्या दिशेने जात होता. दरम्यान, रोशनपूर गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक झाली. यामुळे रिक्षाचा चुराडा झाला. रिक्षातील ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातानंतर लोक घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांनी जखमींना रिक्षातून बाहेर काढून घाईघाईत रुग्णालयात दाखल केले. तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सत्येंद्र गौतम यांनी सांगितले की, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. एसपी नीरज कुमार जादौन यांनी सांगितले की, ऑटोमध्ये १५ जण होते. या अपघातासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. जखमींवर चांगले उपचार केले जात आहेत. अपघात होताच ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच्या शोधाबरोबरच पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर माहिती देऊन फोन करता येईल.