US Air plane and Helicopter Crash : अमेरिकेत भीषण विमान अपघात झाला आहे. वॉशिंग्टन डीसीतील रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे विमान ५३४२ आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची लँडिंग दरम्यान पहाटे धडक झाली. या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळाने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
विमान अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. वॉशिंग्टन डीसी अग्निशमन विभागाने या बाबत स्वतंत्रपणे निवेदन काढून याची माहिती दिली आहे. तर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी देखील या अपघाताची माहिती ट्रम्प यांना दिली असल्याचे जाहीर केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. यावेळी जेट विमान विचिटा, कॅन्सास येथून उड्डाण करत होते. विमानतळाच्या धावपट्टीजवळ येताना लष्कराच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची या विमानाला हवेतच धडक झाली. या विमानात ६५ प्रवासी बसले असल्याची माहिती असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन एअरलाइन्सच्या वेबसाईटनुसार, अपघातग्रस्त विमानाची आसनक्षमता ६५ प्रवाशांची आहे. तर अमेरिकेचे सिनेटर टेड क्रूझ यांनी या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. विमानात किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप कळू शकले नसले तरी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. "
या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक्स व इतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हीडिओत हेलिकॉप्टर विमानाला धडक्ट असल्याचे दिसत असून यानंतर मोठा स्फोट झाल्याचे देखील दिसत आहे. यामुळे हा भीषण अपघात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या