AAP: दिल्ली मद्य घोटाळ्याशी भाजपचा संबंध?; केजरीवालांच्या विरोधात साक्ष देणारा भाजपचा देणगीदार, आम आदमी पक्षाचा दावा-main witness in arvind kejriwal case is prime donor of bjp aap says bjp involved in delhi liquor scam ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  AAP: दिल्ली मद्य घोटाळ्याशी भाजपचा संबंध?; केजरीवालांच्या विरोधात साक्ष देणारा भाजपचा देणगीदार, आम आदमी पक्षाचा दावा

AAP: दिल्ली मद्य घोटाळ्याशी भाजपचा संबंध?; केजरीवालांच्या विरोधात साक्ष देणारा भाजपचा देणगीदार, आम आदमी पक्षाचा दावा

Mar 23, 2024 01:56 PM IST

AAP allegations on BJP : दिल्ली दारू घोटाळ्यात भाजपचा थेट सहभाग असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. घोटाळ्यातील प्रमुख आरोपीनं भाजपला कोट्यवधींची देणगी दिल्याचा दावा आपनं केला आहे.

दिल्ली दारू घोटाळ्यात भाजपचा सहभाग, केजरीवालांच्या विरोधात साक्ष देणारा भाजपचा देणगीदार, आम आदमी पक्षानं पुरावे दाखवले!
दिल्ली दारू घोटाळ्यात भाजपचा सहभाग, केजरीवालांच्या विरोधात साक्ष देणारा भाजपचा देणगीदार, आम आदमी पक्षानं पुरावे दाखवले!

Aap allegations on BJP : 'दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी भाजपचा थेट संबंध आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात साक्ष देणारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हा भाजपचा देणगीदार आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून त्यानं भाजपला ६० कोटींची देणगी दिली आहे,' असा घणाघात करत आम आदमी पक्षानं भाजपला अडचणीत आणलं आहे.

कथित मद्य घोटाळ्याच्या (Delhi liquor case) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर आम आदमी पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर आणि भाजपवर 'आप'नं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या पुरावा म्हणून आपच्या नेत्यांनी काही कागदपत्रेही आज पत्रकार परिषदेत दाखवली.

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिषी व अन्य नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भाजपनं केजरीवाल यांच्या विरोधात कसं कटकारस्थान रचलं याचा खुलासा त्यांनी केला. 'ईडी आणि सीबीआय गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील कथित घोटाळ्याची चौकशी करत होती. या सगळ्या काळात पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचीच चर्चा होत होती. मात्र, आपच्या कुठल्याही मंत्र्याकडून, नेत्याकडून किंवा कार्यकर्त्यांकडून एक पैसाही तपास यंत्रणांना मिळाला नाही, असं आतिषी म्हणाल्या.

कसा फिरला साक्षीदार?

'अरविंद केजरीवाल यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली. शरथ चंद्र रेड्डी नावाच्या एका माणसाच्या साक्षीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हा रेड्डी अरबिंदो फार्मा कंपनीचा मालक आहे. ९ नोव्हेंबर २२ रोजी त्याची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली. आपण कधीही केजरीवाल यांना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी बोललेलो नाही. आम आदमी पक्षाशी माझा संबंधच नाही, असं त्यानं सांगितलं. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीनं त्याला अटक केली. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यानं आपली साक्ष बदलली. मद्य धोरणासंबंधात केजरीवालांशी बोललो होतो असं त्यानं सांगितलं. हे सांगताच त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला, याकडं आतिषी यांनी लक्ष वेधलं.

इलेक्टोरल बाँडमुळं बिंग फुटलं!

सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बाँडचं प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर केंद्र सरकार, निवडणूक आयोग, स्टेट बँक आणि भाजप सर्वांनी बाँडचा तपशील देण्यास टाळाटाळ सुरू केली. मात्र आता इलेक्टोरल बाँडचा तपशील बाहेर आल्यामुळं बऱ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत, असं आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले.

देवाचीच कृपा म्हणायची!

‘उघडउघड वसुली सुरू आहे. घोटाळ्यात प्रमुख आरोपी असलेला शरथ चंद्र रेड्डी हाच भाजपचा प्रमुख देणगीदार आहे. त्यांना इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला ६० कोटी रुपये दिले. भाजपला वाटलं नव्हतं हे सगळं कधी बाहेर येईल. ते आलंही नसतं. सर्वोच्च न्यायालयामुळं हे उघड झालं. देवाच्या कृपेमुळंच इलेक्टोरल बाँडचा तपशील आणि भाजपचं हे पाप बाहेर आलं. भाजपचा मुखवटा फाटला आहे. देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा भाजपनं केला आहे,’ असं भारद्वाज म्हणाले.