Mahatma Gandhi’s Bust Vandalised in Italy : इटलीमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार हा पुतळ्याचे अनावरण काही तासांपूर्वीच झाले होते. खलिस्तानी दहशतवाद्यांनी हा पुतळा तोडला. हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्याबाबत काही वादग्रस्त घोषणा लिहिल्या.
कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटेननंतर आता खालिस्तानी दहशतवादी इटलीतही आक्रमक झाले आहेत. इटलीमध्ये बुधवारी महात्मा गांधींच्या काही तासांपूर्वीच उद्घाटन झालेल्या पुतळ्याची तोडफोड केली. आरोपींनी तोडफोड केलेल्या पुतळ्याच्या खाली खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या संबंधित वादग्रस्त नारे लिहिले. भारताकडून दहशतवादी घोषित केलेल्या निज्जर याची मागील वर्षी १८जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये एका गुरुद्वाराच्या बाहेर गोळी मारून हत्या केली होती.
इटलीतील घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, विक्रमी वेळेत घटनेचा तपास केला. ही घटना जी७शिखर परिषदेच्या काही दिवसाआधी झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. ५० वी जी ७शिखर परिषद १३ ते १५ जून दरम्यान इटलीतील अपुलिया क्षेत्रातील बोर्गो एग्नाजिया येथील आलिशान रिसॉर्टमध्ये आयोजित केली आहे. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी उद्या इटलीच्या अपुलियाकडे रवाना होतील.
जी-७ शिखर परिषदेत यूक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्षाचे पडसाद उमटण्याचे चिन्हे आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन,फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रोन, जापानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शिखर परिषदेत सहभागी होणारे वरिष्ठ नेते असतील. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्कीही त्यांच्या देशावर होत असलेल्या रशियाच्या आक्रमणाबाबत एका सत्रात सहभागी होणार आहेत.
या घटनेबाबत परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी म्हटले की, भारतीय अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचा मुद्दा इटलीच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. याप्रकरणी कारवाई केली जात आहे. क्वात्रा यांनी सांगितले की, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. घटनेबाबत सोशल मीडियावरही लोकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या