Maharashtra Govts Big Decision: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अटल सेतूवरील टोलदरवाढ पुढील वर्षभर थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आधीप्रमाणे २५० रुपये इतकाच टोल कर द्यावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचे उद्घाटन वर्षभरापूर्वी १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पुलामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा मोठा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडीयेथून सुरू होऊन एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडून न्हावा शेवाजवळील चिर्ले गावात संपतो, त्यामुळे मुंबई आणि एमएमआर परिसरातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुढील १२ महिने टोलमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. नवी मुंबई महापालिका परिवहनने (एनएमएमटी) ५० टक्क्यांहून अधिक भाड्यात कपात केल्याने अटल सेतू पुलावरून मुंबई-नवी मुंबई दरम्यानचा प्रवास किफायतशीर झाला आहे.
प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आलेला 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' हा भारतातील सर्वात लांब पूल असून समुद्रावर बांधण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे.
समुद्रावर सुमारे १६.५ किमी आणि जमिनीवर ५.५ किमी लांबीचा हा सहा पदरी पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा) दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या पुलाच्या बांधकामामुळे मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला असून मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.
संबंधित बातम्या