Viral News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी हा निकाल मान्य नसल्याचे म्हटले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही संशय व्यक्त करत सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यातच, सध्या सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन चर्चा केली जात असल्याचे दिसून येते. एका वृत्त वाहिनीच्या युट्यूब चॅनलेवरुनही हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला असून लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मात्र, या व्हिडिओवर आता निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, व्हिडिओतील व्यक्ती ईव्हीएम मशिन हॅक करुन एका राजकीय पक्षाच्या बाजुने निवडणुकांचा निकाल फिरवू असा दावा करताना दिसून येते. त्यामध्ये किती जागांवर निकाल फिरवला जाईल? त्यासाठी व्हीव्हीपॅट मशिनचे काही नंबर मला हवेत आहेत, असेही ती व्यक्ती सांगताना दिसून येते.
इंडिया टुडे स्पेशल इन्व्हेस्टीगेशन स्टोरीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत अमिरेका हॅकर सैजय शुजा याने दावा केली की, तो अमेरिकेतील संरक्षण विभागाच्या तांत्रिक बाबींचा वापर करुन ईव्हीएम हॅक करू शकतो. त्यासाठी त्याने ५४ कोटी रुपयांची मागणी केल्याचं व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओमध्ये केलेला दावा निराधार आणि खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम ही टँपरफ्रूफ आहे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८/४ अन्वये आयटी अॅक्ट २००० च्या कलम ४३(क) आणि कलम ६६ (ड) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ईव्हीएम टँपरफ्रूफ आहे, नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएमवर विश्वास दर्शवला आहे. दरम्यान, २०१९ मध्येही अशाच प्रकारचा दावा केल्याने दिल्लीतील या व्यक्तीविरुद्ध २०२९ मध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या