Amit Shah: अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वादाची ठिणगी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah: अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वादाची ठिणगी

Amit Shah: अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वादाची ठिणगी

Nov 08, 2024 08:30 PM IST

Amit Shah Sangli Sabha: सांगलीत सभेदरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे काय म्हटले? वाचा

अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वादाची ठिणगी
अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वादाची ठिणगी (HT)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. नुकतीच राज्याचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज सांगली येथे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. समर्थ रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचे काम केले, असे वक्तव्य त्यांनी या सभेत केले. मात्र, अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. इतिहास संशोधक आणि माजी खासदार इंद्रजीत सावंत यांच्यानंतर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सभा पार पडली. त्यावळी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, 'समर्थ रामदासांचे पाऊल जिथे पडले, ती ही पवित्रभूमी आहे. समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले.'मात्र, अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यांवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा- अमोल मिटकरी

'शिराळा येथील सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली, हे शोधले पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलु नये', अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिली.

इतिहास संशोधक काय म्हणाले?

'छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ माता आणि शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच १६४२ पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. १६४२ ते १६७२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संबंधांचा कुठेही उल्लेख नाही. यामुळे समर्थ रामदास यांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्यास सांगितला, ही केवळ भाकडकथा आहे. अशा भाकडकथेच्या अधारावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बोलणे चुकीचे आहे', अशा शब्दात इतिहास संशोधक आणि माजी खासदार इंद्रजीत सावंत यांनी संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि सर्व २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर