mahadev app scam : छत्तीसगड आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बुधवारी न्यायालयात महादेव सट्टा ॲप विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. महादेव ॲप अजूनही छुप्या पद्धतीने सुरू असून महादेव ॲपच्या मालकांना पोलिस, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक प्रभावशाली राजकीय व्यक्तींचे संरक्षण असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यांचा प्रभावी वापर करून अनेकांची फसवणूक करून पैसे लुटल्याचं देखील आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. १९ जुलै रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, गुन्हे शाखेने असाही दावा केला आहे की २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्यापासून, महादेव सट्टा ॲपच्या मालकांनी अवैध ऑनलाइन सट्टेबाजीतून दरमहा सुमारे ४५० कोटी रुपये रुपयांची बक्कळ कमाई केली.
छत्तीसगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३ मार्चरोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, छत्तीसगड जुगार (प्रतिबंध) कायदा आणि सार्वजनिक जुगार कायद्याच्या विविध कलमांखाली महादेव सट्टा ॲप विरोधात गुन्हा नोंदवला होता. कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, ईओडब्ल्यूने आरोपपत्रात म्हटले आहे की, 'बेकायदेशीर पैसे उभारण्याचे आणि वितरित करण्याचे काम हवाला द्वारे आणि पोलिस-प्रशासकीय अधिकारी यांच्यामार्फत केले जात होते. हे अधिकारी आणि पुढारी पैशाच्या वितरणात सहभागी होते.
हवालाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन मनी देखील देण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रभावशाली राजकीय व्यक्तींपर्यंत हे पैसे पोहोचले. ईओडब्ल्यूने म्हटले आहे की, 'अनेक पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि प्रभावशाली नेत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महादेव ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीर पैसा आणि मालमत्ता मिळवली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या मते, महादेव बुक ॲपचे मालक रवी उप्पल, शुभम सोनी, सौरभ चंद्राकर आणि अनिल कुमार अग्रवाल यांच्यावर थेट या गेमद्वारे बेकायदेशीर सट्टेबाजी केल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, ऑफलाइन बेटिंगऐवजी त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला होता. व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम आदी वेबसाइटचीही या साठी मदत घेतली जात होती. महादेव बुक हे प्रत्यक्षात विविध वेबसाइट्ससह बेकायदेशीर सट्टेबाजीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म असल्याचे तपासात आढळून आले आहे.
आरोपपत्रात म्हटले आहे की हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांना पोकर, कार्ड गेम, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल इत्यादी खेळांवर चांगल्या आमिषाने सट्टा लावण्यास सांगितले जात होते. या सोबतच व्हर्च्युअल क्रिकेट आणि निवडणूक निकालांवर सट्टा लावण्याचीही महादेव सट्टा ॲपवर सुविधा आहे. महादेव बुक व्यतिरिक्त, त्याच्या मालकांनी रेड्डी अण्णा आणि फेअर प्ले सारखे ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म देखील तयार केले होते. सध्या जगभरात महादेव बुक ॲपच्या तब्बल ४ हजार ५०० ते ४००० शाखा असल्याचे देखील आरोप पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या