Maha kumbh 2025 : महाकुंभ २०२५ आता संपत आला असला तरी लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. संगमावर स्नानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी लोक तासनतास आपल्या गाडीत अडकून पडत आहेत. त्याचवेळी गाड्यांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. या सर्व गोष्टींनी त्रस्त झालेल्या चार मित्रांनी बोटीने जाण्याचा बेत आखला. या मित्रांनी बोटीने २४८ किमी प्रवास करून प्रयागराज गाठले व पवित्र संगमावर स्नान केले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहेत मित्र -
इंदोरी रिपोर्टर २१ नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "महाकुंभात पोहोचण्याची प्रबळ इच्छा बघा की या तरुणांनी बोटीने २४८किलोमीटरचा प्रवास केला. या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, प्रवास कुठून सुरू झाला भाऊ. याला उत्तर देताना बक्सरच्या कम्हारिया गावातून असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये चार जण बोटीने नदीतून प्रवास करताना दिसत आहेत. या बोटीवर अनेक जीवनावश्यक वस्तूही आहेत. त्याचवेळी बोट चालवण्यासाठी एक व्यक्ती मोटरवर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसते.
अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा विचार आपल्या मनात का आला नाही, असे काही जण सांगत आहेत. तर काही जण या मित्रांच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, लोक रस्त्याने गेले, आकाशाने गेले आणि तुम्ही लोकांनी जलमार्ग निवडला. तर काही लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या नावेतील प्रवासाबद्दल अविश्वास ही व्यक्त केला आहे.
कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महाकुंभमेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी ला महाशिवरात्रीला स्नानाने होणार आहे. महाकुंभात संगमावर स्नान करण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठ्या संख्येने प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ५१ कोटी लोकांनी आंघोळ केली आहे. त्याचबरोबर प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या