सदगुरु जग्गी वासुदेव असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना जगभरात आध्यात्मिक गुरुच्या रुपात ओळखले जाते. भारतात जग्गी वासुदेव यांची क्रेझ आहे. त्यांना फॉलो करणाऱ्या अनुयायींची संख्या लाखांच्या घरात आहे. मात्र सध्या जग्गी वासुदेव वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मद्रास हायकोर्टाने त्यांना सवाल केला आहे की, जर आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलीचा विवाह केला आहे, तर अन्य तरुणींना मुंडण करण्यासाठी तसेच वैवाहिक जीवनाचा त्याग करून संन्यासी जीवन जगण्यासाठी का प्रोत्साहित केले जात आहे.
न्यायमूर्ती एसएम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती वी शिवगमन यांच्या खंडपीठात याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी झाली. एका सेवानिवृत्त प्रोफेसरने जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्या व्यक्तीने स्वत:च्या मुलीचा विवाह लावून दिला आणि तिला आयुष्यात स्थिरस्थावर केले. ती व्यक्ती दुसऱ्यांच्या मुलींना मुंडन करून संन्यासीचे जीवन जगण्यास का प्रोत्साहन देत आहेत? हे जाणून घ्यायचं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासूदेव यांच्यावर रिटायर प्रोफेसरने आरोप लावला आहे की, त्यांच्या दोन उच्च शिक्षित मुलींचे ब्रेन वॉश करून त्यांना ईशा योग केंद्रात कायमस्वरुपी राहण्यासाठी मजबूर केले आहे. एस कामराज,जे कोयंबटूरमध्ये तामिळनाडू कृषी विद्यापीठात शिकवत होते. त्यांनी आपल्या मुलींना न्यायालयात हजर करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
सोमवारी न्यायालयात हजर झालेल्या ४२ व ३९ वर्षीय दोन महिलांनी सांगितले की, त्या आपल्या मर्जीने ईशा फाउंडेशनमध्ये रहात आहेत. या महिलांनी एक दशकाआधीच्या प्रकरणात अशीच साक्ष दिली होती. त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांना दावा केला होता की, आई-वडिलांना सोडल्यापासून त्यांचे जीवन नरक बनले आहे.
मुलींचे वडील एस. कामराज यांनी ईशा योग केंद्रात आपल्या मुलींना असं जेवण आणि औषधं दिली जातात, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता गेली असल्याचा आरोप केला आहे. कामराज यांच्या मोठ्या मुलीने ब्रिटेनच्या युनिव्हर्सिटीतून एमटेक केलं आहे. २००८ मध्ये घटस्फोटानंतर तिने योगा क्लासेस सुरु केले. त्यानंतर लहान बहिणीबरोबर ती कोईम्बतूरमधल्या ईशा योग केंद्रात आली. आता दोघीही तिथेच राहातात असं एस कामराज यांनी म्हटलं आहे.
दोन मुलींनी आपल्या आयुष्याचा मार्ग निवडण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला असेल तर त्याबाबत चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही असा युक्तीवाद ईशा फाऊंडेशनच्या वकिलांनी केला आहे. यावर कोर्टाने आम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही पण प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे.