Madhya Pradesh Mobile Blasts News: मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. जेवण बनवताना गरम तेलाच्या कढईत मोबाईल पडून स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रुग्णवाहिकेला उशीर झाल्यामुळे संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हा भिंड जिल्ह्यातील लहार गावातील रहिवाशी आहे. घटनेच्या दिवशी तो घरात जेवण बनवत होता.कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवून तो भाजी टाकण्याच्या तयारीत होता. मात्र, तितक्यात त्याच्या खिशातील मोबाईल उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यामुळे मोबाईलमधील बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत लहार गावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी (वय, १४) आणि एक मुलगा (वय, ८) आहे.
दिवाळीपूर्वी मुंबईजवळील नवी मुंबई शहरात मोठी दुर्घटना घडली. नवी मुंबईतील उलवे येथे एका किराणा दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास नवी मुंबईतील उलवे येथील एका जनरल स्टोअरमध्ये आणि एका घराला भीषण आग लागली. यादरम्यान तीन गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या अपघातात एक महिला आणि दोन मुलांसह कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला.
ज्या जनरल स्टोअरमध्ये आग लागली ते रमेश यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत रमेशही जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत रमेशची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. किराणा दुकानात तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि दुकान आणि घराला आग लागली. १२ किलो आणि ५ किलो वजनाच्या दोन लहान सिलिंडरमध्ये स्फोट झाला. या अपघातात जखमी दुकानदाराची पत्नी मंजू आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. रमेश हा राजस्थानचा रहिवासी आहे. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. त्याच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. जखमींना स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले. गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, याची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे म्हणाले.