मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेने आपल्याच हाताने पतीची हत्या केली. हा खून करण्यापूर्वी तिने अनेक क्राइम सिरिअल्स तर पाहिल्याच, शिवाय घरात बसून प्रियकरासोबत बिअर पार्टीही केली होती. हत्येचे गूढ उलगडल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली आहे.
ग्वाल्हेरमध्ये एक महिला आपल्या पतीच्या मित्राच्या प्रेमात पडली. त्यानंतर पतीला मार्गातून हटवण्याचा विचार करू लागली. काही दिवसांतच पतीच्या मित्राच्या प्रेमात महिला आकंठ बुडाली. महिला तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा विचार करू लागली. त्यानंतर तिने आपल्या पतीलाच संपवण्याचा निर्णय घेतला. आधी खून कसा आणि केव्हा करायचा यावर मंथन झाले. त्यासाठी सातत्याने गुन्हे अन्वेषण मालिका बघून काढल्या. अखेर महिलेने पतीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
लोकेंद्र कुशवाह असे मृत पतीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी लोकेंद्र कुशवाह यांची पत्नी अंजली कुशवाह, तिचा प्रियकर गौरव कुशवाह आणि चुलत भाऊ नंदू यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. लोकेंद्र कुशवाह यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या घरात आढळला, तर त्यांची पत्नी अंजली आणि मावस भाऊ नंदू बेपत्ता होते. वडील नंदलाल यांनी मुलगा लोकेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी लोकेंद्रला मृत घोषित केले. मृत लोकेंद्र यांच्या अंत्यसंस्काराची तयारी घरात सुरू होती. दरम्यान, त्याचा चुलत भाऊ दिनेश कुशवाह याला लोकेंद्रच्या गळ्यावर बोटांचे ठसे आणि नखे दिसली. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे पोलिसांनी अंजली, तिचा भाऊ नंदू आणि प्रियकर गौरव कुशवाह यांना अटक केली. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी आरके सागर यांनी सांगितले की, आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंजली आणि लोकेंद्र यांचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतु अंजलीला तिचा पती आवडत नव्हता आणि तिचे गौरव कुशवाह नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीला मार्गातून हटवण्यासाठी अंजलीने हे भयानक षडयंत्र रचले होते.
पोलीस चौकशीत समोर आले आहे की, गौरवने अंजलीला सांगितले होते, लोकेंद्रने त्याला घरी न येण्याची ताकीद दिली होती. जोपर्यंत लोकेंद्र आहे तोपर्यंत तिला प्रेम मिळणार नाही, असे अंजलीला वाटले. त्यामुळे तिने आपल्या प्रेमासाठी नवऱ्याला वाटेवरून हटवण्याचा निर्धार केला होता. १८ - १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री तिने पतीला रस्त्यावरून हटवले. खून करण्यापूर्वी अंजली आणि तिच्या प्रियकराने एकत्र बिअर पार्टी केली आणि त्यानंतर पतीची हत्या केली.