viral news : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये, एका होमगार्डला बेडवर नोटांचे बंडल पसरवून रील तयार करणे महागात पडले आहे. या तरुणाने बेडवर २०० आणि ५०० रुपयांचे बंडल पसरवून 'क्या होता है पैसे का, पैसे की लगा दूँ ढेरी' हे गाणे लावत रील तयार केले. त्याच्या या रीलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. हा रील पाहुन आता पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला आहे.
रवी शर्मा असे रील तयार करणाऱ्या होमगार्डचे नाव आहे. उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांनी त्याचा रील पाहिला असून याची दखल घेत त्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. रवी शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा रील शेअर केला आहे.
उज्जैन जिल्ह्यात होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या रवी शर्माने बेडवर ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे बंडल लावून एका गाण्यावर रील तयार केला. या रीलचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होमगार्ड रवीने काही दिवसांपूर्वी आपले घर विकल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारातून आलेले पैसे बेडवर मांडून व्हिडिओ तयार केल्याचे सांगितले जात आहे.
त्याने ही रक्कम कोठून आणली याची माहिती घेण्यात आल्याचे जिल्हा होमगार्ड कमांडंट संतोष जाट यांनी सांगितले. रविला घर विकून हे पैसे मिळाल्याचे त्याने सांगितले आहे, त्याने बँकेचे तपशीलही दिले आहेत. सध्या एसपींच्या आदेशानुसार त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. एसपींनी सांगितले की, संबंधित होमगार्ड शिपायाच्या पैशाचा स्रोत काय? याची चौकशी केली जाईल, अवैध पैशाचा स्त्रोत आढळल्यास रक्कम जप्त करून कारवाई केली जाईल.