मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात केबिनमध्ये नगरसेविकेचा पती एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देत होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. यामुळे राग अनावर झाल्याने एएसआयने स्वत:च वर्दी काढली व छाती फुगवून त्यांच्यासमोर उभा राहिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सात महिने आधीचा आहे, मात्र आता व्हायरल होत आहे, यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
काय आहे प्रकरण-
७ महिने आधी कोतवाली पोलीस ठाणे क्षेत्रात नाल्याचे निर्माण करण्यावरून ASI विनोद मिश्रा आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरू होता. वाद वाढल्यानंतर महापालिकाचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले. या वादावर चर्चा सुरू होती. दरम्यान भाजप नेते व नगरसेविकेचा पती अर्जुन गुप्ता यांनी ASI विनोद मिश्रा यांनी धमकी देत म्हणले की, मी तुझी वर्दी उतरवीन, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचा संयम सुटला व त्यांनी स्वत:च आपली वर्दी काढली. ही घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर पोलीस अधिक्षिका निवेदिता गुप्ता यांनी ASI विनोद मिश्रा यांच्यावर वर्दी फाडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. मात्र हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत असल्याने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
एसपी निवेदिता गुप्ता यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज लीक करण व सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. मध्यप्रदेश काँग्रेसने सोशल मीडिया च्या X हँडलवर लिहिले की, सत्तेचा माज पाहा, भाजप नगरसेवकाची धमक पाहा, एका वर्दीधारी अधिकाऱ्याला आपली वर्दी फाडावी लागली !!
हा व्हिडिओ सात महिने आधीचा आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात घडली होती. व्हिडिओमध्ये असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) विनोद मिश्रा वरिष्ठ अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर आपली वर्दी उतरवताना दिसत आहेत.
आता सात महिन्यानंतर व्हिडिओ समोर आला आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेवर टीका करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.