मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यात काही लोकांनी जवळपास ५० गायींना महापूर आलेल्या नदीच्या पाण्यात ढकलून दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी नागौद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडलेल्या या घटनेत जवळपास १५ ते २० गायींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पीटीआयच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी मृत गायींच्या संख्येची पुष्टी केलेली नाही.
नागौद पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक पांडे यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी बमहोरजवळ रेल्वे पुलाच्या खाली काही लोकांनी गायींना दुथडी भरून वाहत असलेल्या सतना नदीत फेकल्याची घटना घटली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. याची दखल घेत पोलिसांनी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात चार लोकांना अटक केली आहे. बेटा बागरी, रवि बागरी, रामपाल चौधरी आणि राजलू चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांनी गायींना मारहाण करत गायींना नदीच्या पाण्यात ढकलले होते. त्यामध्ये काही गायींचा तडफडून मृत्यू झाला होता. यावेळी काही गायींना किनारा गाठण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे या गायीही बुडाल्या.
ठाणे प्रभारी पांडे यांनी म्हटले की, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ५० गायींना पाण्यात ढकलले यातील १५ ते २० गायींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, नदीत फेकलेल्या व मृत्यू झालेल्या गायींची निश्चित संख्या तपासानंतरच समोर येईल. या प्रकरणाचा तपास केला जात असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चारी आरोपींविरोधात ५३५/२४कलम ३२५,३(५)भारतीय न्याय संहिता (बी एन एस),४/९मध्य प्रदेश गौवंश वध प्रतिबंध अधिनियम २००४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा कायदा राज्यात गायींची हत्या रोकण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत सतना पोलीस अधीक्षकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.