भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांना बसवले आहे. मागील १७ वर्षापासून मुख्यमंत्री पदावर राहिलेले शिवराज सिंह आता माजी मुख्यमंत्री बनले आहेत. पक्षाने राज्यात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री निवडले आहेत. पक्षाच्या या निर्णयानंतर मंगळवारी शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावुक झाल्याचे दिसले. त्यांनी म्हटले की, मी येथून निरोप घेत आहे, याचा माझ्या मनात आनंद व खुशी आहे. आम्ही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील जनतेची सेवा करत आहे. जनतेने यावेळी पुन्हा आम्हाला संधी दिली आहे.
यावेळी शिवराज सिंह चौहान यांना विचारण्यात आलं की, निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही दिल्लीला न जाण्याबाबतचं वक्तव्य का केलं होतं? यावर माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले, मी पक्ष नेतृत्वकडे काहीतरी मागण्यापेक्षा मरण पत्करेन.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आतापर्यंत मुख्यमंत्री बनुन जनतेची सेवा केली. आता एक सामान्य आमदार म्हणून जनतेची सेवा करणार. आम्ही लाडली बहन योजनासुरूकेली आहे, याचा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. आता त्या योजने लखपती बहन योजनेच्या रुपात पुढे नेईन. आपल्या माता-भगिनींना जाऊन भेटेन. त्यांचे स्वयं सहायता समूह बनवले जातील.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वात राहिलेली कामं पूर्ण केली जातील. मध्य प्रदेशच्या विकासासाठी मी नेहमीच मोहन यादव यांना मदत करत राहीन. मी आज खूप समाधानी आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वात आपण बहुमतातलं सरकार स्थापन केलं होतं. पुढच्या काळात मी त्याच सरकारचं नेतृत्व केलं. २००८ मध्ये पुन्हा एकदा आपण बहुमत मिळवलं. २०१३ मध्ये देखील आपण जिंकलो. २०१८ मध्ये आपल्याला जास्त मतं मिळाली खरी,परंतु आमदारांच्या संख्येचं गणित जुळून आलं नाही. परंतु, वर्षभराने पुन्हा आपण सत्तेत आलो. आज मी इथून निघत असलो तरी माझ्या मनात समाधान आहे. पुन्हा एकदा आपल्याला बहुमत मिळाल्याने मी खूश आहे.
मुख्यमंत्रीपद न मिळण्याबाबत तसेच दिल्लीला न जाण्याच्या निर्णयाबद्दल विचारल्यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी एक गोष्ट खूप नम्रतेने सर्वांना सांगू इच्छितो की, स्वतःसाठी काहीतरी मागायला जाण्याऐवजी मी मरण पत्करेन. त्यामुळेच मी म्हणालो होतो की,मी दिल्लीला जाणार नाही.
संबंधित बातम्या