मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एका ५ वर्षाच्या मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५ वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या अत्याचारात या निष्पाप मुलीच्या गुप्तांगाला २८ टाके पडले आहेत, तिचे डोके भिंतीवर आपटेले गेले. इतके करूनही नराधमाचे मन भरले नाही. त्याने मुलीच्या संपूर्ण शरीराचा चावा घेत तिला गंभीर जखमी केले. शिवपुरीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडलेली पाच वर्षांची निष्पाप मुलगी सध्या ग्वाल्हेरच्या कमला राजा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) मृत्यूशी झुंज देत आहे.
आपत्कालीन शस्त्रक्रिया करणाऱ्या कमला राजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला मुलीची प्रकृती चिंताजनक होती. जेव्हा तिला दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मुलगी जिवंत राहणार नाही, असे गृहित धरले होते.
शिवपुरीत पाच वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची सविस्तर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत एका साडेसतरा वर्षीय मुलाचा समावेश असून तो दारूच्या नशेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला तिच्या घराच्या गच्चीवरून जवळच्या निर्जन घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, या दरम्यान त्याने वारंवार तिचे डोके भिंतीवर आदळले. ती बेशुद्धावस्थेत आढळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने तिच्या आई-वडिलांना सांगितले की, त्याने तिला आपल्या मिट्ठीत घेतले आणि 'भयानक गोष्टी' केल्या.
आरोपीला फासावर लटकवावे किंवा चौकात गोळ्या झाडाव्यात, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. आरोपीला पीडितेचा लहान भाऊ आणि इतर मुलांनीही पाहिलं आहे. मुलीचा भाऊ आणि इतर मुलांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. मुलीचे आई-वडील दोन तास तिचा शोध घेत होते. त्यानंतर त्यांना आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली.
डॉक्टरांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की तिच्या खाजगी अवयवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि प्रभावित भागांची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागली. मात्र, त्यांचे स्थान स्थिर करण्यात त्यांना यश आले. अंतर्गत आघातामुळे वैद्यकीय पथकाला तिच्या गुप्तांगावर २८ टाके घालून कोलोस्टोमी करावी लागली. आरोपीला पोलिसांनी पकडले असून त्याला अल्पवयीन गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. सोमवारी शिवपुरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप, काँग्रेस आणि स्थानिक नागरिक एकत्र आल्याने मोठा विरोध झाला. त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
संबंधित बातम्या