Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील मैहर या ठिकाणी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना राष्ट्रीय महामार्ग ३० वर घडली. प्रवाशांनी भरलेली एक भरधाव बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींना मैहर, अमरपाटन व सतना जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस ही प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती.
मध्य प्रदेशातील मैहरमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. शनिवारी (२८ सप्टेंबर) रात्री उशिरा प्रवाशांनी भरलेली बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मैहर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रयागराजहून नागपूरला जाणाऱ्या आभा ट्रॅव्हल्सची भरधाव वेगात असलेली लक्झरी बस मैहर जिल्ह्यातील नादानजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ गंभीर जखमी प्रवाशांचा सतना जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अपघातात बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. घटणस्थळांचे दृश्य भयंकर होते. बचाव पथकाने बस गॅस कटरने कापून मृतदेह बाहेर काढले. बचाव पथकाने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे अमरपाटण, मैहर आणि सतना रुग्णालयात पाठवले. गंभीर जखमी झालेल्या बसचालकासह अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये सुमारे ४५ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
मैहरचे एसपी सुधीर अग्रवाल यांनी सांगितले की, "ही घटना मैहरपासून १० किमी अंतरावर असलेल्या रीवा रोड नादान ग्रामीण भागात घडली. बस प्रयागराजहून नागपूरला प्रवाशांसह जात होती. अपघात इतका भीषण होता की, बस ट्रकला धडकली व डंपरमध्ये जाऊन अडकली. त्यानंतर बस कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने बचाव कार्य राबवले. जिल्हाधिकारी विकास सिंह, तहसीलदार जितेंद्र वर्मी यांच्यासह तगडा पोलिस बंदोबस्तात घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले. एसपी मैहर सुधीर कुमार अग्रवाल, सीएसपी राजीव पाठक घटनास्थळी उपस्थित होते.