Madhya Pradesh Rats Viral Video: भारतीय रेल्वेच्या कँटीनमधून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल प्रवाशांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली. मात्र, आता रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉल संबंधित असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर कोणताही प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पदार्थ चुकूनही खाण्याचा विचार करणार नाही. व्हायरल व्हिडिओत आयआरसीटीसीच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉलवरील अन्नावर चक्क उंदीर धावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावरील असल्याचे सांगण्यात आले. एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ ३८ सेकंदाचा आहे, ज्यात रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉलवर ठेवलेल्या पदार्थांवर उंदीर वावरताना दिसत आहेत. सौरभ नावाच्या एका युजर्सने हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. त्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंत्रालयालाही टॅग केले आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे अधिकाऱ्यानी आपली प्रतिक्रिया दिली. रेल्वे अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला त्याचा मोबाईल क्रमांक शेअर करण्याची विनंती केली, ज्यामुळे त्यांना त्वरीत कारवाई करता येईल. रेल्वेच्या संबंधित अशा तक्रारी नोंदवण्यासाठी प्रवासी http://railmadad.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात किंवा १३९ हेल्पलाईन क्रमांकावर फोन करू शकतात, अशीही माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
संबंधित बातम्या