Madhya Pradesh Jabalpur School Girl Video Viral: मध्य प्रदेशातील जबलपूरमधील पानागढ येथील सीएम राइस स्कूल सिगोडमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत संबंधित मुलगी मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध फिरताना दिसत आहे. एका जणाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता ती संतापली. ही मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असल्याचे समजत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या मुलीला कोणी दारू पाजली, याचा शोध तिच्या कुटुबांतील लोक घेत आहेत. मुलीचा शाळेच्या गणवेशातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शाळेतील शिक्षक आणि घरातील कुटुंबीय मुलांकडे लक्ष देत नाहीत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशा घटनांमुळे इतर विद्यार्थ्यांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. या घटनेमुळे विरोधकांकडून शासन आणि सरकारवर निशाणा साधला जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, सिंगोड हायर सेकंडरी स्कूलला वर्षभरापूर्वी सीएम राइज स्कूलची मान्यता मिळाली होती. सीएम राइज स्कूलमध्ये प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षक असल्याचा दावा केला जात होता. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतील, असे बोलले जात होते. पण या शाळेतील मुलीचा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. अल्पवयीन विद्यार्थीला दारू कोणी पाजली? असाही प्रश्न आहे. याप्रकरणी सीएम राइज स्कूलच्या मुख्याध्यापकांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.